तावडे बोरीवलीतून विधानसभा लढवणार!
By admin | Published: July 31, 2014 01:02 AM2014-07-31T01:02:20+5:302014-07-31T01:02:20+5:30
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पार्लेकर असलेले विनोद तावडे आगामी विधानसभा निवडणूक बोरीवलीतून लढविणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पार्लेकर असलेले विनोद तावडे आगामी विधानसभा निवडणूक बोरीवलीतून लढविणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
विनोद तावडे यांनी यापूर्वीच विधानसभा लढविणार असल्याचे सूतोवाच केले होते. शिवाय बोरीवली या विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर दोनदा निवडून येणारे गोपाळ शेट्टी हे आता खासदार झाले. परिणामी त्यांची आमदारकीची जागा रिक्त झाली असून, विनोद तावडे येथील जागेसाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघाची चाचपणी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे बोरीवली विधानसभा ‘सेफर साइट’ असल्याने तावडे येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे विलेपार्ले पूर्वीपासून शिवसेनेकडे असले तरी या वेळी भाजपा या मतदारसंघासाठी प्रयत्नशील आहे. पक्षाचे माजी नगरसेवक पराग अळवणी यासाठी खटाटोप करत असून, शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक शशिकांत पाटकर येथून निवडणूक लढविणार असल्याचे समजते. परंतु मागील दोन विधानसभा निवडणुकीत येथे शिवसेनेच्या वाट्याला पराभव आला होता. त्यामुळे भाजपाने या मतदारसंघावर दावा केला आहे. (प्रतिनिधी)