ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मुंब्रा रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह सापडल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात ५ मार्चला अपमृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणी मनसुख यांची मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएस चौकशी करत होते. मात्र चौकशीदरम्यान मनसुख यांचा मृतदेह सापडल्याने गृहमंत्र्यांनी याबाबत तपास मुंबईपोलिसांकडे न देता एटीएसकडे दिला. मात्र, मनसुख हिरेन संशयित मृत्यूप्रकरणी विधानसभेत राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख यांची हत्याच झाली असून याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करा अशी मागणी धरून लावली होती. तसेच या दरम्यान फडणवीसांनी वसईचे शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक धनंजय तावडे यांचे देखील नाव उघड केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ४ मार्च रोजी मनसुख यांना कांदिवलीहून आलेल्या पोलीस अधिकारी तावडे यांचा फोन आला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने गावडे की तावडे असा प्रश्न निर्माण होतं आहे.
कांदिवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या अधिकाऱ्याने मनसुख यांना फोन केला होता, त्यांनी ठाणे घोडबंदर येथे भेटण्यासाठी बोलावले होते, या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेलेले मनसुख हिरण हे पुन्हा घरी परतलेच नाहीत असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले, परंतु या प्रकरणात कांदिवली येथे तावडे नावाचा कोणी अधिकारीच नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आलं आहे. वसईचे शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक धनंजय तावडे यांचे देखील नाव उघड केले, तर मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा इथल्या रेतीबंदर खाडी परिसरात आढळून आला. पण त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन वसईत आढळून आल्यानं गूढ वाढलं आहे.
तावडे नावाचा अधिकारी नाही...
याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या गुन्हे शाखेत तावडे नावाचा कोणताही अधिकारी नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तो अधिकारी कोण? तो अधिकारीच होता का? की आणखीन कोणी? मनसुख यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
धनंजय गावडे यांनी आरोप फेटाळले
सचिन वाझे नावाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही मदत केलेली नसून मनसुख हिरेन या दोघांशीही माझा काडीमात्र संबंध नसल्याचा खुलासा नालासोपाऱ्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी दिला आहे. तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिनबुडाचे आणि माझी बदनामी करणारे आरोप करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणतेही कागदपत्रे किंवा पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावे अन्यथा अशी बदनामी करू नका अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मनसुख प्रकरणात माझे नाव आल्याने मला आश्चर्य वाटत आहे. तसेच मला वाईट वाटते की इतक्या बड्या नेत्याने असे विधान केल्याचे.
माजी मुख्यमंत्र्यांचे आरोप.......
2017 च्या एका खंडणी प्रकरणात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. एकाचं नाव धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसऱ्याचं नाव सचिन वझे आहे. मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे याच्याकडे आहे. 40 किमी दूर मृतदेह सापडतो…गावडेकडे जाण्याचं कारण काय आहे. याच्यापेक्षा अधिक काय पुरावे हवेत? 201 अंतर्गत सचिन वझेंना तात्काळ अटक का नाही? 302 तर सोडून द्या…हा राजकारणचा विषय नाही पण थेट पुरावे असतानाही 201 अंतर्गत अटक होत नसेल तर कोण आणि कशासाठी वाचवत आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मनसुख हिरेन यांची गावडेंच्या परिसरात गाडीत हत्या केल्यानंतर खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. हाय टाईडमध्ये बॉडी फेकली गेली असती तर ती परत कधीच आली नसती. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि कायद्याच्या सुदैवाने लो टाईड होता आणि तो मृतदेह परत आला त्यामुळे हे उघडकीस आलं आहे असाही आरोप केला आहे.