अडीच हजार कोटींची मार्चमध्ये करवसुली, महसुलात घट नाही, महापालिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:17 AM2024-04-03T10:17:45+5:302024-04-03T10:18:24+5:30
मुंबई महापालिकेने विक्रमी कामगिरी करत एकाच महिन्यात तब्बल २ हजार ४२५ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
मुंबई :मुंबई महापालिकेने विक्रमी कामगिरी करत एकाच महिन्यात तब्बल २ हजार ४२५ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. पालिकेच्या इतिहासातील मार्चमधील मालमत्ता कर वसुलीची ही उच्चांकी रक्कम आहे. कर महसुलात कोणत्याही प्रकारची घट अथवा तूट नसल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.
पालिका हद्दीत एकूण ९ लाख ५५ हजार ३८ मालमत्ता आहेत. त्यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती, निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्या ३ लाख ५६ हजार ६५२ आहे.
एकंदरीतच ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्ता कर आकारणी कक्षात येतात. २०२३-२४ मध्ये २ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ताधारकांनी मिळून ३ हजार १९७ कोटी ३३ लाख रुपयांचा कर भरणा केला आहे. उर्वरित ३ लाख ४४ हजार ७८१ मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरणा केलेला नाही. त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. मालमत्ता कर संकलनाचे निश्चित केलेले सुधारित उद्दिष्ट २५ मे २०२४ पर्यंत गाठण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त केला.