पनवेल : पनवेल-सायन महामार्गावरील प्रस्तावित टोलनाक्याविरोधात आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडलीच, त्याचबरोबर शुक्रवारी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवला. त्यानुसार याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन स्थानिकांना टोलकरिता सवलत देणे, त्याबरोबर हा नाका स्थलांतरित करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.सार्वजनिक बांधकाम विभागाने कोपरा येथे टोल वसूल करण्याकरिता टोल नाका उभारण्याचे काम हाती घेऊन स्थानिकांना लुटण्याचा घाट घातला आहे. यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेला सुरुवात झाली असून आमदार प्रशांत ठाकूर या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघरकरांचा यामध्ये फारसा फायदा नसून त्यांनी पथकर का भरायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून जनजागरण सुरु केले आहे. पनवेल-सायन महामार्गावरील टोल नाका रद्द झालाच पाहिजे. खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेलवासीयांना भुर्दंड कशासाठी, असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. ‘हल्ला बोल नो टोल’ हा संदेश त्यांनी पनवेलकरांना दिला आहे. दरम्यान, जनजागृतीमुळे आता पनवेल आणि सिडको वसाहतीतील रहिवाशांकडूनही याबाबत प्रतिक्रिया येऊ लागल्या असून आमदारांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आहे. यासंदर्भात ११ जून रोजी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी ठाकूर यांनी ज्या परिसरात टोल नाका उभारला जात आहे त्या ठिकाणाहून स्थानिक रहिवाशांची हजारो वाहने ये-जा करतात. पनवेलकरांना याचा नाहक भुर्दंड बसत आहे. म्हणून स्थानिकांना या टोलनाक्यावर सूट द्या किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करुन द्या. त्याचबरोबर हे शक्य होत नसेल तर संबंधित टोल नाक्याचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली. (वार्ताहर)
खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना कर सवलत ?
By admin | Published: June 16, 2014 3:17 AM