Join us

सेंद्रीय खत प्रकल्प उभारणाऱ्या सहा इमारतींना कर सवलत; दरमहा २२ ते २६ हजारांची सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 1:49 AM

कचऱ्यात सरासरी २०० किलोंची घट

मुंबई : वांद्रे, खार, सांताक्रुझ या परिसरातील सहा गृहनिर्माण सोसायट्यांनी इमारतींच्या आवारात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या इमारतींमधून तयार होणाऱ्या कचऱ्याचीदेखील त्यांच्याच स्तरावर विल्हेवाट लावली जात आहे.या इमारतींमध्ये एकूण एक हजार दोन सदनिका असल्याने या परिसरातून महापालिकेच्या कचराभूमीवर दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यामध्ये सरासरी एक हजार २०० किलोंची घट झाली आहे. त्यामुळे या इमारतींना मालमत्ता करात पाच टक्के म्हणजेच दरमहा सुमारे २५ हजार रुपये सवलत मिळणार आहे.

कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी सोसायट्यांना त्यांच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आवाहन पालिका प्रशासनानेसोसायट्यांना केले आहे. यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या सोसायट्या-इमारती ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प उभारतील व तो नियमितपणे राबवतील, त्यांना मालमत्ता करात कमाल १५ टक्के एवढी सवलत देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ‘एच पूर्व’ विभागातील सहा इमारतींच्या परिसरात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारून त्याचा नियमित वापर सुरू आहे.

याअंतर्गत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खतात रूपांतर करण्याचे प्रकल्प सहाही इमारतींच्या परिसरात उभारण्यात आले आहेत. सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही इमारतींच्याच स्तरावर केली जात आहे. त्यामुळे नियमानुसार सहाही इमारतींना मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेच्या ‘एच पूर्व’ विभाग कार्यालयाने नुकताच घेतला आहे. यानुसार या इमारतींना आता दरमहा सुमारे २२ ते २६ हजार रुपयांची सवलत मालमत्ता करात मिळणार असल्याची माहिती सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली.

प्रशस्तिपत्र देऊन गौरविले

वांद्रे पूर्व, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व येथील कलिना, वाकोला, शासकीय वसाहत, कलानगर, विद्यापीठ परिसर, शिवाजीनगर, खेरवाडी परिसरातील या इमारती आहेत. एमआयजी ग्रुप २, ३ व ४, गोल्डन स्क्वेअर, आर्किटेक्ट टेक्निशियन या पाच सहकारी सोसायट्यांसह कॉम्प्युटर मेंटेनन्स कॉर्पोरेशन मर्यादित या सहा इमारतींमधून दररोज सरासरी एक हजार २०० किलो एवढ्या प्रमाणात कचरा तयार होतो. या सर्व कचऱ्याची विल्हेवाट आता इमारतींच्या स्तरावर लावली जात आहे. सहा इमारतींच्या प्रतिनिधींना प्रभाग समितीचे अध्यक्ष शेखर वायंगणकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन नुकतेच एका समारंभात गौरविण्यात आले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकरमुंबई