आॅनलाइन लॉटरीत कोटींची करचुकवेगिरी
By admin | Published: March 4, 2016 02:03 AM2016-03-04T02:03:00+5:302016-03-04T02:03:00+5:30
परराज्यातील आॅनलाइन लॉटरीचालकांनी केलेल्या ९३३ कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीसाठी नेमके जबाबदार कोण, असा सवाल माहीतगारांकडून केला जात आहे.
मुंबई : परराज्यातील आॅनलाइन लॉटरीचालकांनी केलेल्या ९३३ कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीसाठी नेमके जबाबदार कोण, असा सवाल माहीतगारांकडून केला जात आहे.
१२ एप्रिल १९६९ रोजी महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू झाली. महाराष्ट्र राज्य लॉटरी संचालनालयाकडून सोडतीवर २00६ पासून लॉटरी कर आकारला जाऊ लागल्याने परराज्यातील अभिकर्ता याविरोधात न्यायालयात गेले आणि त्यांनी यावर स्थगिती घेतली. स्थगिती उठविल्यानंतर ते रीतसर कर भरू लागले. मात्र न भरलेला कर एकूण ९३३.८४ कोटी रुपये इतका असल्याचे सांगण्यात येते. यामुळे या उद्योगावर अवलंबून असलेले लॉटरी विक्रेते आणि उद्योगधंदे अडचणीत आले आहेत.
मुळात या ९३३.८४ कोटी रुपयांची असेसमेंट करण्यात आली ते कशाच्या आधारावर हेसुद्धा गुलदस्त्यात आहे. सन २00७-0९ मध्ये जे काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून लॉटरी ड्रॉचे निकाल छापून आले होते त्याआधारे लावले आहेत की अधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीवरून यावरही संदिग्धता आहे.
गेल्या दोन वर्षांत या करचुकवेगिरीबाबत सरकार निष्क्रिय कसे काय राहिले, असा सवाल केला जात आहे. २00९ नंतर सर्व प्रवर्तक नियमितपणे आगाऊ लॉटरी कर भरत असले तरी सन २00७-0९ या कालावधीत ९३३.९४ कोटी रुपये इतकी लॉटरी कराची थकबाकी आहे. जमीन महसुलाप्रमाणे थकीत लॉटरी कर वसूल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. देशात सध्या मिझोराम, अरुणाचल, सिक्किम, पंजाब, गोवा, नागालँड, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांच्या लॉटरी महाराष्ट्रात चालू आहेत. या सगळ्या प्रकरणात लॉटरी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाच हात असल्याचाही आरोप होत असून या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)