मुंबई : व्यावसायिक झोपडपट्ट्यांवर कर लावण्याऐवजी सेवा देण्याच्या नावावर मुंबईभर केबल जाळे पसरवून कोट्यवधी कमावणाऱ्या खासगी आस्थापनांवर महापालिकेने कर आकारावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली. राज ठाकरे यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली.
गेल्या काही वर्षांत मोबाइल कंपन्यांनी विविध सेवा पुरवण्याच्या नावावर त्यांच्या वाहिन्या जमिनीखालून शहरभर पसरल्या आहेत. या कंपन्यांकडून कर घेतल्यास पालिकेला कायमस्वरूपी ८ ते १० हजार कोटींचे उत्पन्न मिळू शकते, असा दावा करत ठाकरे यांनी केला. राज्य सरकारने संबंधित कंपन्यांना सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गगराणी यांनी ठाकरे यांना दिली. तर या संदर्भात राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून कर आकारणी करण्याची परवानगी आयुक्त मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य सेवेवरचा ताण कमी करण्याची गरज
देशभरातून येणाऱ्या रुग्णांमुळे मुंबई महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या सरकारी रुग्णालयांवरचा ताण हा वाढतच आहे.
के. ई.एम. रुग्णालयाची क्षमता ही २२५० खाटांची असून, तेथे जर रोज १० हजार रुग्ण येत असतील, तर आरोग्य व्यवस्था कोलमडणारच आहे.
सुमारे ३० ते ३५ लाख रुग्ण हे परराज्यातून उपचार घेण्यासाठी मुंबईत येत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा पुरावा,
म्हणून आधारकार्डावरील पत्त्याच्या आधारे आरोग्य सेवा द्यावी, असे ठाकरे म्हणाले.
मूर्तिकारांना नियमाचे पालन करण्याचा सल्ला
पीओपीच्या गणेशमूर्तींवर शासनाने आणि पालिकेने बंदी घातल्यानंतर आता राज ठाकरे यांनीही मूर्तिकारांना नियमाचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याची जाणिव असेल, तर पीओपी न वापरण्याबाबत मूर्तिकारांनी विचार करायला हवा, असे ते म्हणाले.