मुंबई : मुंबईतील सातशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्यास अनुकूलता दर्शविल्याने याचे श्रेय आपल्या खिशात घालण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. यामुळे आपल्या वचननाम्यातील घोषणा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू असताना भाजपाने ७५० चौरस फुटांच्या करमाफीचा प्रस्ताव आणून शिवसेनेची कोंडी केली आहे. त्यामुळे उभय पक्षांमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार आहे.फेब्रुवारी २०१७मध्ये महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेने आपल्या वचननाम्यातून ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी तर ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ६० टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. मात्र या वचननाम्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. शिवसेनेच्या या प्रस्तावाची हवा काढून घेण्यासाठी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी मुंबईतील ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्याची मागणी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मागणी मान्य करत महापालिकेला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. यामुळे शिवसेनेने गेल्या जुलै महिन्यात महासभेत मंजूर ५०० चौरस फुटांच्या करमाफीच्या ठरावाच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू केले. मात्र पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी ७५० चौरस फुटांच्या घरांना करमाफीची ठरावाची सूचना महापालिका सभागृहात सादर केली आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्राद्वारे त्यांनी विनंतीही केली आहे.
‘७५० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:53 AM