मुंबई : दक्षिण मुंबईत पर्यटकांसाठी असलेल्या घोडागाडी (व्हिक्टोरिया) बंद करायच्या, तर या घोडागाड्यांच्या चालक, मालकांचे, तसेच घोड्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात पॅकेजचे प्रारूप मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केले आहे. हे पॅकेज लवकरच राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविले जाईल आणि ती मंजुरी मिळाल्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयात मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. समितीच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत पुनर्वसनाच्या पॅकेजचे प्रारूप निश्चित करण्यात आले.मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०१५ च्या निर्णयाने या घोडागाड्यांवर बंदी आणली होती. एक वर्षाच्या आत या बंदीची अंमलबजावणी करावी आणि ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत शासनाने पुनर्वसनाचे पॅकेज सादर करावे, असे उच्च न्यायालयाने त्या वेळी म्हटले होते. आता विलंबाने का होईना, पण शासनाने पॅकेज तयार केले आहे. या पॅकेजनुसार, घोडागाडी चालक-मालकांना टॅक्सी वा रिक्षाचे परवाने देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. हे दोन्ही नको असतील, तर हॉकरचा परवानादेखील घेता येईल. घोड्यांची कायमस्वरूपी काळजी घेण्याची तयारी काही स्वयंसेवी संस्थांनी दर्शविली आहे. घोड्यांचे मालक हे घोडे त्यांच्याकडे देऊ शकतील, स्वत:कडे ठेवू शकतील किंवा घोड्यांची विक्रीदेखील करू शकतील. शासनाची या प्रारूपाला मान्यता घेण्यापूर्वी, घोडागाडी चालक-मालकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
घोडागाडी चालकांना मिळणार टॅक्सी आणि रिक्षाचे परवाने
By admin | Published: June 01, 2016 4:24 AM