Join us

महिलेचे अपहरण करून विनयभंग करणारा टॅक्सीचालक अटकेत

By admin | Published: May 02, 2017 3:46 AM

दोन आठवड्यांपूर्वी शिवडी येथे महिलेचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून आर.ए.के. मार्ग पोलिसांनी शादाब शेख (२६) या

मुंबई : दोन आठवड्यांपूर्वी शिवडी येथे महिलेचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून आर.ए.के. मार्ग पोलिसांनी शादाब शेख (२६) या एका खासगी वातानुकूलित टॅक्सी सर्व्हिस कंपनीच्या चालकाला अटक केली आहे. आरोपी घाटकोपर येथे राहणारा असून, विवाहित आहे तसेच त्याला एक मुलगा आहे.पोलीस उपनिरीक्षक तसेच तपास अधिकारी संभाजी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी शिवडी कोर्ट परिसरात राहणारी पीडित महिला तिच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघाली होती. त्या वेळी शेख हा याच परिसरात टॅक्सी उभा करून उभा होता. या महिलेला त्याने रस्त्यात अडविले. तसेच या ठिकाणी लहान मुलांना सांभाळण्यासाठी आणि घरकामासाठी कोणी बाई मिळेल का? अशी विचारणा करत तिच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. बोलता बोलता ‘आपण कुठे जात आहात, मी तुम्हाला सोडतो,’ असे सांगत त्याने या महिलेला टॅक्सीत बसण्यास सांगितले. काही अंतरावर टॅक्सी जाताच त्याने या महिलेचा हात धरला आणि ‘माझ्याशी मैत्री करशील का? तू मला फार आवडतेस, मी रोज तुला याच रस्त्याने जाताना पाहतो...’ असे बोलू लागला. तसेच तिच्याकडे तिचा मोबाइल क्रमांकदेखील मागितला. तेव्हा ही महिला घाबरली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा आता आपल्याला मार पडणार या भीतीने त्याने गाडीची गती कमी केली. तशी ही महिला टॅक्सीतून बाहेर पडत असतानाच त्याने तिचा मोबाइल हिसकावला आणि पळ काढला.दरम्यान, घडलेला प्रकार महिलेने तिच्या घरी सांगितला. त्यानुसार तिच्या घरच्यांनी या प्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत बनसोड यांच्या नेतृत्वाखाली तपास करणाऱ्या पथकाने या महिलेच्या मोबाइलचे टॉवर लोकेशन शोधले. जे घाटकोपरचे निघाले.  या परिसरात सापळा रचून पोलिसांनी शेखचा गाशा गुंडाळला. त्याच्यावर अपहरण, विनयभंग,  दरोडा या कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला  २ मेपर्यंत पोलीस कोठडी  सुनावल्याचे बनसोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)