हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, लूटीच्या उद्देशाने हल्ला केल्याचा संशय
प्रवाशाकडून टॅक्सी चालकावर चाकूने हल्ला
सीसीटीव्ही फूटेज व्हायरल : चोरीचा उद्देश असल्याचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माटुंगामध्ये वाटेतच टॅक्सी थांबवून टॅक्सी चालकावर चाकूने हल्ला केल्याचे थरकाप उडविणारे सीसीटीव्ही फूटेज शुक्रवारी व्हायरल झाले. या हल्ल्यात टॅक्सीचालक मोहम्मद इरफान थोडक्यात बचावला असून, त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवत माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत. चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
माटुंगा येथील एका कॉलेजच्या शेजारी गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी प्रवाशाने टॅक्सीचालकाला कॉलेजच्या पुढच्या गल्लीत टॅक्सी थांबविण्यास सांगितले. पुढे त्याच्याकडे मोबाइलची मागणी केली. चालकाने मोबाइल देण्यास नकार देताच आरोपीने त्याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्ये दरवाजा असल्याने त्याच्यावर जास्त वार झाले नाहीत. त्यानंतर आरोपीने पळ काढला. चालकाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधताच जवळच गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले.
इरफानच्या तक्रारीवरून शुक्रवारी माटुंगा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासात चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचा संशय असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. तसेच आरोपीच्या चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे ओळख पटविण्यास अडचण निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.