टॅक्सी चालकाला पोलिसाची मारहाण, बसपाकडून कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:05 AM2018-10-21T06:05:11+5:302018-10-21T06:05:19+5:30
वरळी येथे वाहतूक पोलिसाने टॅक्सी चालकाला मारहाण केल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टीने कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई : वरळी येथे वाहतूक पोलिसाने टॅक्सी चालकाला मारहाण केल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टीने कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असून कारवाई झाली नाही, तर बुधवारी, २४ आॅक्टोबरला दुपारी १ वाजता पोलिसांविरोधात निदर्शने करण्याचा इशारा बसपाचे मुंबई अध्यक्ष सुरेश विद्यागर यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बसपाचे दक्षिण मुंबई उपाध्यक्ष महेंद्र शिंदे म्हणाले की, वााहतूक पोलिसांनी टॅक्सी चालक रमेश शिवजोर गौतम यांना केलेल्या बेदम मारहाणीत रमेश यांच्या हाताला गंभीर जखम झाली. त्यात हाताला तीन टाके पडले आहेत. तरीही रमेश यांची तक्रार घेण्याऐवजी वरळी पोलीस ठाण्यात रमेश यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून सुरू असलेली ही मनमानी असून त्याविरोधात आयुक्तांनी निष्पक्ष कारवाईची मागणी बसपाने केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून बसपा आपला रोष व्यक्त करेल, असा इशाराही महेंद्र शिंदे यांनी दिला आहे.