मुंबई - दहिसरमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याची महिंद्रा कंपनीची स्काॅर्पिओ मोटार कार जून महिन्यात चोरीला गेली. याबाबत व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर दहिसर पोलिसांनी वाहनचोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक वसंत पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्काॅर्पिओच्या बाजूला एक ओला टॅक्सी उभी असल्याची दिसली. पोलिसांनी त्यावरून ही टॅक्सी चालविणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत ही टॅक्सी खादिम शेख हा देखील चालवित असल्याचे समजले. खादिम हा उत्तर प्रदेशाच्या राठी जिल्ह्यातील गावी गेल्याची माहीती मिळाली. या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने हे गाव गाठले आणि मोठ्या शिताफिने खादिम याला पकडले. त्याच्याकडून चोरी केलेली स्काॅर्पिओ जप्त केली.
पोलिसांच्या चौकशीमध्ये खादिम याच्यावर जवळपास २९ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. तो एक टोळी चालवित असून त्याचे साथीदार अब्दुल सत्तार, इंद्रेश यादव, उमेश यादव, रोहीतकुमार मिश्रा ऊर्फ मिंटू यांचा पोलीस शोध घेत आहेत.
टॅक्सीआड वाहनचोरी
खादिम साधी टॅक्सी किंवा ओला टॅक्सी घेऊन बाहेर पडतो. एखाद्या साथीदाराला सोबत घेतो. रस्त्याकडेला वाहन पार्क केलेले दिसले की त्याच्याशेजारी टॅक्सी नेऊन लावतो. टॅक्सीच्याआड वेगवेगळी हत्यारं अथवा मास्टर की वापरून वाहनाचा दरवाजा तोडतो आणि ते घेऊन उत्तरप्रदेश गाठतो. टॅक्सी त्याचा दुसरा साथीदार चालवतो. अशी होती या चोरट्यांनी मोडस ऑपरेंडी.