गतिमंद मुलीच्या मदतीसाठी टॅक्सी चालकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:10 AM2018-05-01T05:10:16+5:302018-05-01T05:10:16+5:30
भायखळ्यात लहानपणापासून गतिमंद जीवन जगणाऱ्या २६ वर्षीय कविता चांदोस्कर या मुलीच्या पुनर्वसनासाठी टॅक्सी चालकांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई : भायखळ्यात लहानपणापासून गतिमंद जीवन जगणाऱ्या २६ वर्षीय कविता चांदोस्कर या मुलीच्या पुनर्वसनासाठी टॅक्सी चालकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, टॅक्सी चालकांच्या या उपक्रमाला आर्थिक तुटवडा जाणवत असल्याने, स्थानिक सार्वजनिक मंडळे आणि राजकीय पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाºयांनीही कविताच्या पुनर्वसनासाठी मदत गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या उपक्रमाने आता लोकचळवळीचे रूप घेतले आहे.
भायखळ्यातील ई. एस. पाटणवाला मार्गावरील महापालिका शाळेसमोरील पदपथावर कविता वडिलांसह राहते. वयाच्या अवघ्या तिसºया वर्षी कविताच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले. गतिमंद असल्याने कविताला सर्व विधींसाठी वडिलांवर अवलंबून राहावे लागते. तिच्या वाढत्या वयानुसार वडिलांसमोरील समस्या वाढल्या आहेत. पदपथावरील झोपड्यांवर महापालिकेने कारवाई केल्याने, कविताला उघड्यावरच ठेवण्याची नामुष्की वडिलांवर आली आहे. मुलगी वयात आल्यानंतर ज्या अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते, त्या सर्व समस्यांना तिचे वडील सामोरे जात आहेत. जागेअभावी कवितासाठी त्यांना नेहमी कुठे ना कुठे आडोसा शोधावा लागतो. मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे, कविताच्या वडिलांना तिला एकटे सोडून जाणेही धोकादायक वाटते. परिणामी, विभागातील काही लोकांकडून मिळणारे जेवण, वस्तू यावरच त्यांची उपजीविका चालते.
पदपथाशेजारी टॅक्सी पार्क करणाºया विभागातील चालकांनी ही परिस्थिती पाहून तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी हाती घेतली आहे. मुंबईच नव्हे, तर मुंबईबाहेरील जिल्ह्यांत त्यांनी पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. मात्र, यश मिळाले नाही. अखेर पुण्यातील ओम श्री साई ओम गतिमंद मुला-मुलींची शाळा व पुर्नवसन केंद्र या आश्रमशाळेत तिचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आश्रमशाळेच्या संचालिका कल्पना वर्पे यांनीही कविता निराधार आहे हे समजताच, तिच्या कायमस्वरूपी निवास, आरोग्याच्या व्यवस्थेची जबाबदारी विनामूल्य घेण्याची पूर्ण तयारी दर्शविली. कविताप्रमाणेच वर्पे यांच्या आश्रमशाळेत ३५ मुले-मुली आहेत. त्यांच्यासाठी जमेल तितकी मदत गोळा करण्यासाठी या टॅक्सी चालकांकडून पत्रक वाटत, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मदतीचे आवाहन केले जात आहे.
कुठे कराल मदत?
भायखळ्यातील घोडपदेव परिसरात असलेल्या वाळुंज चाळीसमोर या उपक्रमांतर्गत मदत स्वीकारली जात आहे. रविवारी २९ एप्रिलपासून ५ मेपर्यंत सायंकाळी ७ ते १० या वेळेत ही मदत स्वीकारली जाणार आहे. मदतीमध्ये चांगल्या स्थितीतील जुन्या वस्तू, खेळणी, कपडे, तसेच आर्थिक मदत घेतली जात आहे. स्थानिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मुंबईकरांनीही अधिकाधिक प्रतिसाद देण्याचे आवाहन टॅक्सी चालक विकास पवार यांनी केले आहे.