ओव्हरटेकच्या रागात कुटुंबावर चढवली टॅक्सी, टॅक्सीचालकाला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 06:10 AM2017-11-21T06:10:26+5:302017-11-21T06:10:37+5:30
मुंबई : ओव्हरटेक केल्याच्या वादातून शनिवारी नागपाडा येथे टॅक्सीचालक आणि कारचालकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
मुंबई : ओव्हरटेक केल्याच्या वादातून शनिवारी नागपाडा येथे टॅक्सीचालक आणि कारचालकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. कारचालकाचे कुटुंबही भांडणात उतरले. याच रागात टॅक्सीचालकाने भरधाव टॅक्सी कारचालकासह त्यांच्या कुटुंबीयांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पसार टॅक्सीचालकाला बेड्या ठोकल्या.
फारूक सोबतअली असे टॅक्सीचालकाचे नाव आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. जे. जे. मार्ग परिसरातून खान कुटुंबीय कारने जात असताना फारूकच्या टॅक्सीला त्यांनी ओव्हरटेक केले. या रागात फारूक आणि कारचालकामध्ये वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. खान कुटुंबानेही फारूकसोबत वाद घातला. बघ्यांची गर्दी वाढली. ते पाहून रागाच्या भरात फारूक टॅक्सीत बसला. त्याने भरधाव टॅक्सी खान कुटुंबीयांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न करत तेथून पळ काढला.
घटनेची वर्दी लागताच नागपाडा पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी जखमींना जे.जे. रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नगमा बानो नोहित खान यांच्या जबाबावरून वरील घटनाक्रम समोर आला. सुरुवातीला अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
मात्र तपासात वरील बाबी समोर येताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनावरून नागपाडा पोलिसांनी रविवारी फारूकविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
अटक केलेल्या फारूकला रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली.