टॅक्सी, रिक्षांसाठी स्वतंत्र वाहनतळ
By Admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:09+5:302016-03-16T08:36:09+5:30
मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षांच्या स्वतंत्र वाहनतळासाठी विकास नियोजन आराखड्यात जागा राखून ठेवण्याचे पालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे़ यामुळे वाहतूककोंडीवर
मुंबई : मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षांच्या स्वतंत्र वाहनतळासाठी विकास नियोजन आराखड्यात जागा राखून ठेवण्याचे पालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे़ यामुळे वाहतूककोंडीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असा विश्वास पालिकेला वाटत आहे़
मुंबईत टॅक्सी आणि उपनगरांमध्ये टॅक्सी व आॅटोरिक्षा यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्या प्रमाणात वाहनतळांची संख्या मात्र कमी असल्याने, वाहनचालकांना आपले वाहन रस्त्याच्या कडेला अथवा अन्य ठिकाणी उभे करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही़ परिणामी, वाहतूक खोळंबा होऊन पादचाऱ्यांना आणि स्थानिक रहिवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो़
यावर टॅक्सी व रिक्षांसाठी प्रभागनिहाय स्वतंत्र वाहनतळ तयार करणे हा एक उपाय ठरू शकेल, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. अशी तरतूदच विकास नियोजन आराखड्यात केल्यास, टॅक्सी व रिक्षांसाठी स्वतंत्र वाहनतळ उभे करणे सोपे जाईल, असे मत त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मांडले होते़ यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विकास आराखडा तयार करत असताना, नगरसेवकांच्या सूचनेचा विचार करून तशी तरतूद करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे़ (प्रतिनिधी)