Join us  

प्रवाशांसाठी टॅक्सी टॉप लवकरच

By admin | Published: June 19, 2014 2:18 AM

भाडे नाकारणे, ड्युटीवर नसलेल्या टॅक्सी प्रवाशांना न समजल्यामुळे वाद निर्माण होणे, अशा कारणांमुळे मुंबईकरांना होणारा त्रास लवकरच कमी होणार आहे.

मुंबई : भाडे नाकारणे, ड्युटीवर नसलेल्या टॅक्सी प्रवाशांना न समजल्यामुळे वाद निर्माण होणे, अशा कारणांमुळे मुंबईकरांना होणारा त्रास लवकरच कमी होणार आहे. मुंबईत धावणाऱ्या टॅक्सी सहजतेने उपलब्ध होण्यासाठी परिवहन विभागाकडून टॅक्सी टॉप लावण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र राज्य सरकारच्या अखेरच्या अधिसूचनेच्या प्रतीक्षेत परिवहन विभाग असल्याने त्यांची अंमलबजावणी होणे बाकी आहे. टॅक्सी टॉप लावल्यास ती टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे की नाही, समजण्यास सोपे जाणार आहे. रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांना सहजतेने उपलब्ध होत नाहीत. भाडे नाकारणे, प्रवासी टॅक्सी-रिक्षात असतानाही प्रवाशांकडून ती मिळवण्याचा प्रयत्न होणे, तसेच आॅफ ड्युटी असतानाही प्रवाशांना ते न समजणे, यामुळे बराच वाद चालक आणि प्रवाशांत होतो. हा वाद मिटविण्यासाठी आणि टॅक्सी-रिक्षा प्रवाशांना सहज उपलब्ध करण्यासाठी ‘टॉप’ लावण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. भारतातील काही शहरात तसेच परदेशातही टॅक्सींवर टॉप लागल्याने प्रवाशांना त्या सेवेचा लाभ घेण्यास सोपे जाते. मात्र मुंबईत टॅक्सी आणि रिक्षांवर टॉप नसल्याने प्रवाशांसोबत होणारे वाद पाहताच हा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारीत परिवहन विभागाकडून टॅक्सी आणि रिक्षांवर टॉपर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र टॅक्सींच्या वर हे टॉप लावल्यानंतर त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर रिक्षांवर टॉप लावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. टॉपमध्ये तीन प्रकार असणार आहेत. ‘फॉर हायर’,‘एंगेज’ आणि ‘आॅफ ड्युटी’ असे प्रकार आहेत. त्यामुळे टॅक्सी पकडताना प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. या तीन प्रकारांसाठी टॉपसाठी विविध रंगही असणार असून या रंगांमुळे प्रवाशांना समजण्यास मदत होईल.(प्रतिनिधी)