Join us  

२० महिने न्यायालयात हजर न केल्याने खितपत पडलाय टेलर

By admin | Published: July 06, 2016 2:39 AM

मूळचा कानपूर येथील रहिवासी असलेला व गेल्या २० वर्षांपासून महिलांचे कपडे शिवणारा एक व्यक्ती (नाव जाहीर न करण्याच्या अटीवर) गेल्या २० महिन्यांपासून ठाणे मध्यवर्ती

-प्रज्ञा म्हात्रे,  ठाणे

मूळचा कानपूर येथील रहिवासी असलेला व गेल्या २० वर्षांपासून महिलांचे कपडे शिवणारा एक व्यक्ती (नाव जाहीर न करण्याच्या अटीवर) गेल्या २० महिन्यांपासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात कच्चा कैदी म्हणून बंदी आहे. या काळात आपल्याला एकदाही न्यायालयात हजर केलेले नाही, अशी कैफियत त्याने ‘लोकमत’कडे मांडली.शिवणकामात तरबेज असल्याने एकाहून एक सरस अशा डिझाईन्सचे महिलांचे कपडे तो शिवतो. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत तो शिवणकाम करतो. कारागृहातील अनेकांसाठी हा टाइमपास असला तरी त्याला मात्र त्याची शिवणकला जोपासायला मिळते याचाच आनंद झाला आहे. महिलांचे कपडे शिवण्यातील या कच्च्या कैद्याचे कसब विलक्षण असल्याचे कारागृहातील पोलीस व कर्मचारी मान्य करतात. सध्या या कैद्याला शिवणकलेखेरीज दुसरे कोणतेच काम नसल्याने फारच थोड्या कालावधीत तो महिलांचे वेगवेगळ््या डिझाईनचे कपडे शिवून देत असल्याने हा कैदी कर्मचारी व पोलीस यांच्यात लोकप्रिय ठरला आहे. या कैद्याने तयार केलेले काही ड्रेस हे एखाद्या फॅशन डिझायनरच्या तोडीचे आहेत. एखादी डिझाईन त्याला भावली की ती प्रत्यक्षात उतरवल्याशिवाय तो राहत नाही. काही कर्मचारी, पोलीस यांनी त्याला आपल्या निकटवर्तीयांकरिता ड्रेस शिवून देण्याची गळ घातली. त्यांनी त्यांच्या पसंतीची डिझाईन सांगितल्या त्या कैद्याने स्वत: त्या डिझाईनमध्ये बदल करून आकर्षक कपडे तयार करून दिले, अशी माहिती कारागृहातील कर्मचाऱ्यांनीच दिली.बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कच्चा कैदी म्हणून हा लेडीज टेलर तुरुंगवास भोगत आहे. तुरूंगात एकूण २८५० कैदी असून त्यापैकी केवळ ११० कैदी हे न्यायालयाने शिक्षा सुनावलेले आहेत. म्हणजे तब्बल २७४० कच्चे कैदी आहेत. त्यापैकी अनेक कच्च्या कैद्यांना दीर्घकाळ न्यायालयात हजरही केलेले नाही. पोलिसांचे अपुरे संख्याबळ, बंदोबस्त यामुळे न्यायालयात हजर करता आले नाही, असे कारागृहातील कर्मचाऱ्यांनी मान्य केले. कारागृहाच्या चार भिंतीत बंदीस्त असलेल्या कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना वेगवेगळ््या वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ तयार करण्याची संधी दिली जाते. पोलिसांची संख्या कमी असल्याने कच्च्या कैद्यांना न्यायालयात हजर केले जात नव्हते. दोन महिन्यांपासून कैद्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. ठाण्यात ६०० पोलीस प्रशिक्षण घेऊन दाखल झाले असल्याने आता ही समस्या दूर होईल. कैद्यांना न्यायालयात नेण्याकरिता सुरक्षा देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र न्यायालयात हजर केले नाही असा एकही आरोपी ठाणे कारागृहात नाही.- हिरालाल जाधव, अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह