मुंबई : क्षयरोगाविषयी जागरूकता वाढविण्याच्या हेतूने लालबागचा राजा आणि हेस्टॅक ॲनालिटिक्स यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईत क्षयरोग जागरूकता आणि निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . मुंबई महापालिकेत स्माईल इनक्युबेटर; महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत या कार्यक्रमांतर्गत हेस्टॅक टीबी निर्मूलनाविषयी प्रचार करणार आहे.
टीबी रुग्णांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या या क्रांतिकारी तंत्रज्ञानाची सुरुवात करण्यासाठी हेस्टॅक अग्रणी पाऊल उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. १५ सप्टेंबर ते दि. ३० सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील ५०० रुग्णांची डब्ल्यूजीएस आधारित मोफत निदान चाचणी करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या कार्यक्रमाला नगरसेवक सचिन पडवळ, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, मुंबई क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे, डॉ. अनिर्वान चटर्जी, लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात सहभागी होणारी हेस्टॅक ॲनालिटिक्स ही आयआयटी मुंबईमधील साईनअंतर्गत स्टार्टअप कंपनी असून, डॉ. अनिर्वान चॅटर्जी आणि गौरव श्रीवास्तव हे या कंपनीचे संस्थापक आहेत. डॉ. किरण कोंडा बाघिल (प्राध्यापक, आयआयटी मुंबई) यांचा यासंदर्भातील संशोधनात महत्त्वाचा सहभाग आहे.