Join us

लॉकडाऊनचा असाही फायदा! मुंबईत ३० टक्क्यांनी 'टीबी'चे रुग्ण झाले कमी, मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 2:05 PM

मुंबईत २०२० या वर्षात कोविड-१९ च्या महामारीमुळे लॉकडाऊन करावा लागला. पण त्यामुळे शहरातील टीबीच्या रुग्णांच्या संख्येत झाल्याचा नवा अहवाल समोर आला आहे.

मुंबईत २०२० या वर्षात कोविड-१९ च्या महामारीमुळे लॉकडाऊन करावा लागला. पण त्यामुळे शहरातील क्षयरोगाच्या म्हणजेच 'टीबी'च्या रुग्णांच्या संख्येत झाल्याचा नवा अहवाल समोर आला आहे. मुंबईत २०२० या वर्षात 'टीबी'च्या रुग्णसंख्येत तब्बल ३० टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आहे. २०१९ साली मुंबईत एकूण ६० हजार ५९७ टीबीचे रुग्ण आढळले होते. तर २०२० या वर्षात त्यात घट होऊन ४३ हजार ४६४ रुग्ण नोंदवले गेल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. याशिवाय कोविडचा संसर्ग झालेले टीबीचे फक्त २४१ रुग्ण नोंदवले गेल्याचंही पालिकेनं म्हटलं आहे. 

'टीबी' रोगावर नियंत्रण मिळवल्याबद्दल मुंबईतील एकूण तीन विभागांना केंद्राकडून पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला आहे. परळ या भागात गेल्या पाच वर्षांत टीबीच्या रुग्णांमध्ये ४० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर परळ विभागाला टीबीवर नियंत्रण मिळवल्याबद्दल केंद्राकडून रौप्य पदक जाहीर करण्यात आलं आहे. तर घाटकोपर, प्रभादेवी आणि ग्रँट रोड विभागाला कांस्य पदक देण्यात आलं आहे. येत्या २०२५ सालापर्यंत टीबी रोगाला हद्दपार करण्याचं लक्ष्य भारतानं ठेवलं आहे. 

दरम्यान, कोरोनामुळे टीबीच्या रुग्णांवर मोठा परिणाम होईल आणि 'टीबी'चेही रुग्ण वाढतील अशी भीती सुरुवातीला व्यक्त करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात आकडेवारी पाहता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसून आलं आहे. २०२० या वर्षात मुंबईत एकूण १३ हजार १५५ टीबीच्या रुग्णांपैकी फक्त २४१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईसाठी ही देखील एक चांगली गोष्ट आहे. तर गेल्या तीन महिन्यात टीबीची सहव्याधी असून कोरोनामुळे दगावलेला एकही रुग्ण आढळलेला नाही. २०२१ या वर्षात म्हणजेच गेल्या दोन महिन्यात टीबीच्या एकूण १९५६ रुग्णांपैकी ४१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

टॅग्स :मुंबईआरोग्यकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस