मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण; वाझेने एटीएसला खोटा जबाब दिल्याचे उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या कथित हत्येच्या कटासाठी वापरण्यात आलेले सिमकार्ड गुजरातमधील एका कंपनीच्या नावावर खरेदी केल्याची माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या तपासातून समोर आली. एटीएसने दीव दमण येथून व्होल्वो कार जप्त केली असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तिची तपासणी सुरू आहे. दरम्यान, सचिन वाझेने एटीएसला दिलेला जबाबही खोटा असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजित सिंह यांनी मंगळवारी दिली.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात त्यांची पत्नी विमला यांच्या तक्रारीवरून ७ मार्च रोजी हत्येचा गुन्हा नोंदवत एटीएसने तपास सुरू केला. विमला यांनी सचिन वाझेवर हत्येचा संशय व्यक्त केला. ८ मार्च रोजी संशयित आरोपी असलेल्या सचिन वाझेचा जबाब नोंदविण्यात आला. यावेळी वाझेने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच स्कॉर्पिओ वापरली नसून मनसुख यांनाही ओळखत नसल्याचे सांगितले होते.
तपासात वाझेने दिलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाल्याचे सिंह यांनी सांगितले. पुढील तपासात वाझेच्या सांगण्यावरून बुकी नरेश गोर याने विनायक शिंदेला सिमकार्ड पुरवले. गोर याने गुजरातमधील एका व्यक्तीकडून एकूण १४ सिमकार्डे मिळविली. शिंदेने यातील काही सिमकार्डे सुरू करून अन्य साथीदारांना दिली. याच सिमकार्डचा वापर करून शिंदेने मनसुख यांना घटनास्थळी बोलावून घेतले होते; तर काही सिमकार्ड आणि फोन त्यांनी नष्ट केल्याची माहिती समोर आली. यात, दोघांचा सहभाग स्पष्ट होताच २१ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली. हे सिमकार्ड गुजरातमधील एका कंपनीच्या नावावर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
सिमकार्ड पुरविणाऱ्या व्यक्तीला एटीएसने ताब्यात घेऊन मंगळवाऱी मुंबईत आणले. गुन्ह्यात वापर झाल्याच्या संशयातून दीव दमण येथून एक व्होल्वो कारही पथकाने जप्त केली. शिवाय कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने कारची तपासणी सुरू आहे. विनायकचा हत्येच्या कटात प्रत्यक्ष सहभाग असल्याचेही एटीएसने सांगितले. शिंदेला घटनास्थळी नेऊन त्यांनी गुन्हा कसा केला याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. तसेच त्याचे घर, कार्यालय, गोडावूनमध्ये झाडाझडती घेण्यात आली. हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अधिक तपास सुरू असल्याची माहिती सिंह यांनी दिली.
...............................................