रेल्वे स्थानकांवर आजही ‘पेपर कप’मध्येच चहा, 'कुल्हड’चा बाजारात तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 02:12 AM2020-12-06T02:12:59+5:302020-12-06T07:17:31+5:30
Tea News : मुंबईत अद्यापही अनेक रेल्वे स्थानकांवर पेपर कपमध्येच चहा मिळत आहे. तर काही रेल्वे स्थानकांत कुल्हडमध्ये चहा मिळतो, मात्र त्याला तुरळक प्रतिसाद आहे.
मुंबई : रेल्वे स्थानकांवर यापुढे ‘पेपर कप’ऐवजी ‘कुल्हड’मधून चहा द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. पण मुंबईत अद्यापही अनेक रेल्वे स्थानकांवर पेपर कपमध्येच चहा मिळत आहे. तर काही रेल्वे स्थानकांत कुल्हडमध्ये चहा मिळतो, मात्र त्याला तुरळक प्रतिसाद आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देशातील सर्व रेल्वे स्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. २००४ ते २००९ दरम्यान यूपीएच्या काळात लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री होते. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा रेल्वे स्टेशनवर कुल्हडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती. मात्र, त्यांचे मंत्रिपद जाताच हा उपक्रम बंद पडला. पुन्हा पेपर कपमधून चहा देण्यात येऊ लागला.
कुल्हडमधून चहा देण्यात येणार असल्याने कंत्राटदाराला शहरातील कुंभार व्यावसायिकांकडून कुल्हड खरेदी करावे लागतील. मात्र आता कुल्हडचा तुटवडा आहे. कुल्हड महाग असल्याने विक्रेते जे ग्राहक कुल्हडची मागणी करतील त्यांनाच ते देत आहेत. कुल्हड वापरून फेकून दिले जातात. सध्या एक कुल्हड ५ रुपयांना मिळतो. यामुळे चहाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
चहा मोफतच द्यावा लागेल
कुल्हड अजून घेतले नाहीत. कोठे मिळतात याची माहिती नाही. पेपर कप ५० पैशांना मिळतो तर कुल्हड ५ रुपयांना. आज आम्ही चहा ५ रुपयांना विकतो. पण आता कुल्हडच जर ५ रुपयांना मिळणार असेल आणि चहाही ५ रुपयांनाच विकावा लागणार असेल तर चहा ‘मोफत’च द्यावा लागेल. त्यामुळे मोठे नुकसान होईल. - मोहम्मद अली, विक्रेता, मध्य रेल्वे
पर्यावरणास हितकारक
कुल्हड हे मातीचे आहेत त्यामुळे ते पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक आहेत. पेपर कपमुळे मोठ्या प्रमाणात कचरा होता. कुल्हडमुळे प्रवाशांनाही फायदा होईल.
- सदानंद पावगी,
उपाध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ
कुल्हड मिळत नाही
आता दोन आठवड्यांपूर्वी स्टॉल सुरू केले आहेत. कुल्हडमध्ये चहा देण्यास सांगितले आहे. कुल्हड मिळत नाही. सध्या पेपर कपमध्ये चहा देत होतो. पण मशीन बंद पडली. एक आठवडा चहा बंद ठेवणार आहे.
- नागेश गौडा, विक्रेता, पश्चिम रेल्वे