मुंबई - राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून राजधानी मुंबई येथे सुरुवात होत आहे. तत्पूर्वी सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलविलेल्या चहापान कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे, सत्ताधारी आणि मित्रपक्षांतील नेतेमंडळी आणि आमदारांनीच चहा-पानाचा कार्यक्रम उरकला. या कार्यक्रमात विविध पक्षाचे नेते एकत्र येऊन चाय पे चर्चा करत होते. दरम्यान, जयंत पाटील अन् जयंत पाटील असा फोटो सध्या सोशल मीडियातून समोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांना आपल्याकडील चहा देताना या फोटोत दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्या हातातील चहा ते त्यांना देत आहेत. त्यामुळे, शेजारीच उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांचा हात धरला. शेजारीच मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण हेही उपस्थित होते. आता, अजित पवार यांनी नेमका हा का धरला असा प्रश्न फोटो पाहिल्यानंतर आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही.
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी शेकापच्या जयंत पाटील यांना आपला चहा देऊ केल्याने, अजित पवार यांनी त्यांचा हात धरला. तसेच, पाठिमागे उभे असलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी तात्काळ दुसरा चहाचा कप आणण्यासाठी धाव घेतली आणि चहाने भरलेला कप शेकापच्या जयंत पाटील यांना दिला. त्यावेळी, पाटील यांनीही तो चहा प्रेमाने स्विकारत राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानले. दरम्यान, या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही गैरहजर होते.
अधिवेशनापूर्वी फडणवीसांची पत्रकार परिषद
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. राज्यातील विविध प्रश्नांवर राज्य सरकारला विधानसभेत जाब विचारणार असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यात, शेतकऱ्यांच्या प्रश्न, एसटी कामगारांचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न रेंगाळले असून सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, राज्यातील ओबीसी आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यात राज्य सरकार कमी पडले. तसेच, राज्यानेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीचा इम्पॅरिकल डेटा जमा करायचा होता. मात्र, त्यांनी केंद्राकडे बोट दाखवत वेळकाढूपणा केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.