मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना उत्तर भारतीयांना कोरोना पसरवणारे म्हणून अपमान केला असून ज्या उत्तर प्रदेशाने गुजरातमधून वाराणसीत आलेल्या नरेंद्र मोदींना निवडून दिले त्यांचाच मोदींनी घोर अपमान केला, हा कृतघ्नपणा आहे. मोदींनी केलेल्या अपमानाची सल उत्तर भारतीयांच्या मनात असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करून भाजपाला धडा शिकवा, अशा आशयाची एक लाख पत्रे मुंबईतील उत्तर भारतीय बांधव त्यांच्या नातेवाईकांना पाठणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सेलचे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी दिली.
उमाकांत अग्निहोत्री यांनी गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईसह महाराष्ट्रात लाखो उत्तर भारतीय बांधव काम करतात व उत्तर प्रदेशातील आपल्या कुटुंबाचेही पालन पोषण करतात. महाराष्ट्राने नेहमीच उत्तर भारतीयांना सुरक्षा, सुविधा पुरवल्या आहेत. कोरोनाच्या संकटातही मुंबईसह महाराष्ट्रातील उत्तर भारतीय बांधवांना राशन, औषधे व जिवनावश्यक वस्तू देऊन काँग्रेस व महाविकास सरकारने मदत केली आणि गावात जाण्यासाठी रेल्वे, बसची सुविधाही पुरवली परंतु उत्तर भारतीयांनी कोरोना पसरवला असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचा घोर अपमान केला आहे.
ज्यांना आम्ही निवडून दिले ते एवढे कृतघ्न निघाले याचा मनस्ताप होत आहे. आता नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, भारतीय जनता पक्ष यांच्या भुलथापांना उत्तर भारतीयांनी बळी पडू नये. मंदिर- मशिद, हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करणारे भाजपा व समाजवादी पक्ष या दोघांनाही या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या. प्रियंका गांधी यांच्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’, अभियानाला साथ द्या, काँग्रेसला मतदान करा आणि काँग्रेसलाच सत्तेत आणा, असे आवाहन अग्निहोत्री यांनी केले आहे.
कोरोना व्हायरस म्हणून अपमान केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा आम्ही उत्तर भारतीय तीव्र शब्दात निषेध करत आहोत. आमच्या भावना व्यक्त करणारी एक लाख आंतरदेशी पत्र उत्तर प्रदेशातील नातेवाईंकांना पाठवणार आहोत. १३ तारखेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते कुर्ला टर्मिनस येथून ही सर्व पत्रे पाठवली जाणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हे पत्र उत्तर प्रदेशातील लाखो नातेवाईकांना पाठवले जाणार आहे, असेही अग्निहोत्री म्हणाले.