सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्यांना धडा शिकवा, एकनाथ शिंदे यांचे पोलिसांना सक्त निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:02 PM2021-09-22T12:02:41+5:302021-09-22T12:02:49+5:30
सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या जवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची नुकतीच हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पात बाधा ठरणाऱ्या नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर देण्याचे निर्देश नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मुंबईत त्यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षकांना हे आदेश दिले.
सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या जवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची नुकतीच हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून सुरजागड प्रकल्प त्वरित थांबवण्याचा इशारा दिला होता. या घटनेनंतर मंत्री शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सदर मृत व्यक्तीचा सुरजागड प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
सुरजागड लोहखनिज प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तो कार्यान्वित करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबवताना त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास जशास तसे उत्तर देण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच नक्षली कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील रस्ते आणि दळणवळण वेगाने सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यासाठी या भागातील रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.