मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून शाळा-महाविद्यालये बंद असून, शिक्षकांकडून आॅनलाइन, आॅफलाइन पद्धतीने शिकविले जाते आहे. मात्र, आता शिक्षक कोणत्या माध्यमातून, काय शिकवितात, याचा आढावा घेऊन त्याच्या संकलनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेने (एससीईआरटी) शिक्षकांना पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक करण्याचे निर्देश दिले आहेत.
एससीईआरटीच्या २४ सप्टेंबरच्या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांच्या, प्राथमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक करीत असलेल्या आॅनलाइन प्रयत्नांची, उपक्रमांची माहिती राज्य सरकारसह केंद्र सरकारला तसेच राज्यांच्या बैठकीतही सादर करण्याच्या दृष्टीने या माहितीचे संकलन केले जात आहे. एससीईआरटीने उपलब्ध करून दिलेल्या लिंकच्या माध्यमातून शिक्षकनिहाय आॅनलाइन व आॅफलाइन अध्ययन-अध्यापन पद्धतीच्या माध्यमाची माहिती शिक्षकांनी सादर करायची आहे. यासाठी सर्वात आधी शिक्षकांनी लिंकवर जाऊन स्वत:ची नोंदणी करायची आहे. त्यावरून शिक्षकनिहाय शाळानिहाय, केंद्र, तालुका, जिल्हानिहाय अहवाल तयार करण्यात येईल.दरम्यान, आॅनलाइन शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकांना केंद्रावर रुजू होणे, घरोघरी जाऊन माहिती घेणे, टोल नाक्यावरील ड्युटी अशी अनेक कामे देण्यात आली. त्यानंतर, कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आणि प्रवासाची सुविधा नसतानाही अनेक शिक्षकांना शाळेत बोलवल्याने त्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले. अनेक शिक्षकांना बीएलओची (बुथ लेवल आॅफिसर) ड्युटी लावली. आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जबाबदारीही शिक्षकांवर सोपविली आहे. या सर्वांत शिक्षकांनी शिकवायचे कधी, हा प्रश्न आहेच.शिक्षकांवर अविश्वासशिक्षकांनी अध्यापनाचा अहवाल दर आठवड्याला सादर करायला हवा, यात दुमत नाही. मात्र, यासाठी स्वतंत्र आदेश काढून शाळा, मुख्याध्यापक व शिक्षकांवर प्रशासनाकडून अविश्वास दाखविला जात आहे. शिक्षण विभागातील अधिकारी काय कामे करतात, हेसुद्धा पारदर्शकतेने सादर करण्याचा आदेश काढण्यास हरकत नव्हती.- प्रशांत रेडीज,सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना