'त्या' शिक्षिकेनं पतीनंतर, आता सासूबाईंवर केले अंत्यसंस्कार
By मनोहर कुंभेजकर | Published: September 10, 2023 07:34 PM2023-09-10T19:34:36+5:302023-09-10T19:36:13+5:30
पतीचे निधन झाले तेव्हा नीता चांदवडकर यांचा मुलगा 4 वर्षांचा तर मुलगी 1 वर्षांची होती.
मुंबई-गोरेगाव (पूर्व) - यशोधाम शाळेतील शिक्षिका नीता चांदवडकर यांचे पती हेमंत चांदवडकर यांचे 21 वर्षांपूर्वी नाशिक येथे अपघाती निधन झाले होते. तेव्हा त्यांनी आपल्या पतीवर अंत्यसंस्कार केले होते. आता नुकतेच त्यांच्या सासूबाई लीलावती (87) यांचे निधन झाले. मात्र सासूबाईंचा मुलगा अथवा आपला पती हयात नसल्याने नीता चांदवडकर यांनी स्वतः मुलाप्रमाणे विधीपूर्वक आपल्या सासूबाईंवर अंत्य संस्कार केले. गोरेगाव (पूर्व) आरे चेक नाका येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी न डळमळता हा अंत्यविधी पार पाडला, अशी माहिती महाराष्ट्राच्या वंजारी समाजाचे अध्यक्ष मारुती उगले यांनी लोकमतला दिली.
पतीचे निधन झाले तेव्हा नीता चांदवडकर यांचा मुलगा 4 वर्षांचा तर मुलगी 1 वर्षांची होती. पतीच्या निधनाने त्यांना आणि एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या सासूबाईंना दुःखाचा मोठा सामना करावा लागला. 2001मध्ये अल्पशा आजाराने त्यांच्या सासऱ्यांचेही निधन झाले. मुलांना उच्च शिक्षण देणे हे ध्येय होते. नोकरीला जावे लागत असल्याने मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सासूबाईनी घेतली. आज त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षित होवून आघाडीवर आहेत.
आईच्या मायेने सासूबाईनी काळजी घेतली. अशा कठीण प्रसंगी नीता चांदवडकर या शिक्षिकेने कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन अध्यात्माच्या जोरावर संसाराचा गाडा सासूबाईंच्या आधाराने पुढे नेला. आता त्यांनी सासूबाईंवर अंत्यसंस्कार केले. हा समाजातील मुलींनी एक घेण्यासारखा आदर्श आहे, असे मत मारुती उगले यांनी व्यक्त केले.