- मनोहर कुंभेजकर
मुंबई : प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे शाळेतील दिवस! या आठवणींना उजाळा देऊन एक स्मित हास्य गणेश भक्तांच्या मुखावर झळकावे, या विधायक दृष्टीकोनातून आपल्या घरी जोगेश्वरी पूर्व येथील प्रमोद वसंत महाडीक या शिक्षकाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून आराध्यदैवत गणपती समोर "आठवणीची शाळा " या विषयावर चलचित्र देखावा उभारला आहे.
आठवणीतील शाळा हा देखावा साकारतांना त्यांनी भूतकाळातील शाळेत केलेल्या खोड्या, भोगलेल्या शिक्षा, परीक्षेच्या काळातील मानसिकता, मुलींबद्दलचे स्वतःचे तर्क, सुटीच्या सूचनेचा आनंद, मैदानावरील मारामारी, शालेय खेळ, शाळेतील दुनियादारी, गणिताच्या तासाला घेतलेला बाथरुमचा आधार अशा सर्व प्रसंगाचे वर्णन करुन प्रत्येक गणेश भक्ताची मनातल्या मनात हास्यकळी फुलवण्याचा या देखाव्यातून त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे .
प्रमोद महाडीक यांना यापूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, जोगेश्वरी भूषण पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले असून ते 24 वर्ष शिक्षक या पदावर भांडुप येथील अमरकोर विद्यालय, येथे कार्यरत आहेत. जय मुंबई पोलीस हे नाट्य विनामूल्य संपूर्ण मुंबईत सादर करत असून घरगुती गणपती सजावटीच्या माध्यमातून 46 वर्ष समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत, अशी माहिती जोगेश्वरी (पूर्व ) येथील सामाजिक कार्यकर्ता सुरक्षा शशांक घोसाळकर यांनी दिली.