Teacher: डी.एड., बी.एड.साठी लाखोंचे डोनेशन, पण २ वर्षे बिनपगारी, शिक्षक बनण्याकडे अनेकांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 01:25 PM2023-09-15T13:25:27+5:302023-09-15T13:26:18+5:30
Teacher: पूर्वीच्या काळात शिक्षक म्हणून करिअर निवडण्याला वेगळा मान होता. आता मात्र याच करिअरच्या वाटेकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे. याखेरीज, खासगी संस्थांमध्ये लाखो रुपयांचे डोनेशन आकारण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
मुंबई - पूर्वीच्या काळात शिक्षक म्हणून करिअर निवडण्याला वेगळा मान होता. आता मात्र याच करिअरच्या वाटेकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे. याखेरीज, खासगी संस्थांमध्ये लाखो रुपयांचे डोनेशन आकारण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्याचप्रमाणे, वर्षानुवर्षे शिक्षक भरती होत नसल्याने नोकरी मिळणेही सुकर राहिलेले नाही.
शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला डी. एड.चा अभ्यासक्रम कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. सध्या पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्रवेश होताना दिसून येत नाही. बी.एड. साठीही काहीशी परिस्थिती अशीच निर्माण होत आहे. खासगीमध्ये सहा ते सात हजार रुपयांपासून काम करत आहेत.
बी.एड.कडेही विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर डी. एड. पात्रतेबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा, संस्थाचालकांसाठी मुलाखती यांसारख्या प्रक्रियेतून जावे लागत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल तीन ते चार टक्क्यांच्या पुढे जात नाही. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाही म्हणून नोकरीची संधी मिळत नाही, अशी तक्रार विद्यार्थी मांडत असतात. मात्र यावर काहीच ताेडगा निघत नसल्याचे चित्र आहे.
नवा अभ्यासक्रम
नव्या शैक्षणिक धोरणानुसार, बारावीनंतर चार वर्षांचा बी.एड. कोर्स असणार आहे. पदवी घेतलेल्या उमेदवारांना दोन वर्षात बी.एड. पूर्ण करता येईल. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एका वर्षात बी.एड. करता येईल.
डी.एड. इतिहासजमा होणार
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अकृषक विद्यापीठांमध्ये जून २०२३-२४ पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यात डी.एड. अभ्यासक्रम नसेल.
२१ अध्यापक विद्यालयांना टाळे
काही वर्षांपासून विद्यार्थी उपलब्ध होत नसल्यामुळे राज्यातील अनेक डी. एड. विद्यालये बंद करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने यापूर्वीच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांशी जोडून असलेले डी.एड. अभ्यासक्रमाचे वर्ग यापूर्वीच बंद केले आहेत.
खासगी विनाअनुदानित संस्थांनादेखील विद्यार्थ्यांसाठी धावाधाव करावी लागत असल्यामुळे राज्यातील अनेक अध्यापक विद्यालयांनी यापूर्वीच अध्यापक विद्यालये बंद करण्याचे प्रस्ताव सरकारला सादर केले होते. मागील वर्षांपेक्षा यावर्षी २१ अध्यापक विद्यालयांनी प्रवेशप्रक्रिया थांबविली आहे.
खासगी संस्थांनाही विद्यार्थी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी शोधण्याची वेळ त्यांच्यावरती
आली आहे.