शिक्षण विभागाचे राज्य शिक्षक परिषदेला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय झाला आहे. १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) घेण्यात यावी यासंदर्भात शिक्षण विभागाकडून राज्य शिक्षक परिषदेला निर्देशही देण्यात आले आहेत.
सद्य:स्थितीत राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार असून, पहिल्या टप्प्यात टीईटीच्या माध्यमातून ६१०० जागा भरण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून टीईटी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सरकारकडून ६ हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आयोजित केली जाणार आहे.
राज्यात दरवर्षी ७ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दोन वर्षांच्या गॅपमुळे १० लाख उमेदवार यावेळी परीक्षेला बसतील असा अंदाज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
मागील काही वर्षांत टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. टीईटी पात्र असूनही ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील असंख्य शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी व्यक्त केले.