Join us

शिक्षक, मुख्याध्यापक करणार दिल्ली वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा होण्याकरिता ग्राम विकास विभागाकडून अभ्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा होण्याकरिता ग्राम विकास विभागाकडून अभ्यास गट गठीत करण्यात आला असून हा अभ्यास गट दिल्लीच्या सरकारी शाळांच्या मॉडेलचा सविस्तर आढावा घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहे. या अभ्यास गटाने दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणे, शिकवण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, सुविधा, शिकवण्याची कार्यपद्धती या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करायचा आहे. हा अहवाल ग्रामविकास मंत्र्यांकडे सादर करायचा आहे.

जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अधिकाधिक सुधारणा होणे. त्या सोबतच विद्यार्थ्यांना जगातील सर्व तंत्रज्ञानासहीत शिक्षण देणे यासारख्या बाबी जागतिकीकरणाच्या काळात आवश्यक आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये काळानुरूप शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झालेल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांकरिता व शिक्षकांकरीता असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या आचार-विचार व शिस्त तसेच शिक्षकांना शिकवण्याची कार्यपद्धती या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याकरिता तज्ज्ञ मंडळींचा अभ्यास गट गठीत केला असून या अभ्यास गटाला दिल्ली इथे पाठवण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये कशाप्रकारे शिक्षण दिले जाते, या कार्यपद्धतीचा सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याकरिता तज्ज्ञ मंडळींचा अभ्यास गट राज्य सरकारकडून गठीत करण्यात आला आहे.