जनगणनेसाठी शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 01:23 AM2020-02-29T01:23:33+5:302020-02-29T01:23:47+5:30
पालिका शाळांसाठी परिपत्रक जारी; शिक्षक संघटनांचा विरोध
मुंबई: सोळाव्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून सुरू होईल. या कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १० मार्चपासून ते १५ जूनपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोणतीच रजा मंजूर करण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. याचा परिणाम शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्टीवर होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे.
मुंबईतील मनपा शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची नियुक्ती जनगणना २०२१ च्या कामासाठी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठीच्या प्रशिक्षणाचा कालावधी १२ मार्च ते १९८ एप्रिलदरम्यान असेल.
त्यानंतर १ मे ते १५ जून या कालावधीत घरांची यादी, घरांची गणना या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे क्षेत्रीय काम पूर्ण केले जाईल. त्यामुळे कोणत्याही शिक्षकांना सुट्टी मंजूर करण्यात येऊ नये, असे निर्देश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. अध्यापनाच्या दिवसांमध्ये शिक्षकांना शाळाबाह्य कामे देण्यात येऊ नयेत, असे न्यायालयाचे आदेश आहेत. आता मे महिन्याच्या सुट्टीत शिक्षकांना कामाला लावण्यात येणार आहे. या आदेशाला शिक्षक संघटनांनी मात्र तीव्र विरोध केला आहे. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत. असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.