सर्व जिल्ह्यांमध्ये होणार ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:07 AM2021-02-11T04:07:26+5:302021-02-11T04:07:26+5:30

ग्रामविकास मंत्र्यांची माहिती : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचे मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई, : ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते ...

'Teacher Motivation Workshop' to be held in all districts | सर्व जिल्ह्यांमध्ये होणार ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’

सर्व जिल्ह्यांमध्ये होणार ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’

Next

ग्रामविकास मंत्र्यांची माहिती : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई, : ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. डिसले यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन ते या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या माध्यमातून शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दिली.

तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक डिसले यांची जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून निवड झाली. त्यांच्या ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील १४३ हून अधिक देशातील १४०० पेक्षा जास्त शाळांतील मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी डिसले यांनी १६ हजारपेक्षा अधिक शिक्षकांना मार्गदर्शन केले असून, राज्यातील शिक्षकांना त्याचा फायदा होत आहे. डिसले यांनी नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. राज्यातील इतर शिक्षकांनाही त्यांच्या कामाची ओळख व्हावी, तसेच शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

......................................

Web Title: 'Teacher Motivation Workshop' to be held in all districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.