मुंबई : अनुदानाच्या प्रश्नावर शिक्षक संघटना आणि शिक्षणमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करत असतानाही भेट मिळत नसल्याने शिक्षकांनी मंत्रालयावर हल्लाबोल आंदोलन केले. मात्र, या वेळी झालेल्या भेटीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘शिक्षकांना एक टक्काही अनुदान वाढवून मिळणार नाही,’ असे वक्तव्य केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अनुदानाच्या प्रश्नावरून गेल्या आठ दिवसांपासून आझाद मैदानात शिक्षक निदर्शने करत आहेत. मात्र, तावडे यांच्याकडून भेटीसाठी वेळ मिळत नसल्याने शिक्षकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयावर हल्लाबोल आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका बजावत शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाची शिक्षणमंत्र्यांसह भेट घडवून आणली. काही मिनिटांच्या या भेटीत शिक्षणमंत्र्यांकडून नकारघंटाच ऐकू आल्याचा आरोप विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रशांत रेडीज यांनी केला आहे. रेडीज यांनी सांगितले की, एक टक्का अनुदान वाढवून देणार नाही, असा शिक्षणमंत्र्यांचा पवित्रा होता. ३० आॅगस्ट २०१६च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वर्षभरात टप्पा आंदोलनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, आता त्यांना त्या आश्वासनाचा विसर पडल्याचा रेडीज यांचा आरोप आहे.सरकार शिक्षकांच्या मागणीनुसार टप्पा अनुदान देत असेल तर स्वागत आहे. मात्र त्यासाठी सरकारने लेखी आश्वासन देत अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी. नुसत्या आश्वासनावर शिक्षक आंदोलन मागे घेणार नाहीत.- प्रशांत रेडीज,मुंबई प्रदेशाध्यक्ष, कृती समितीसंघटनेने केलेले आरोप खोटे आहेत. शिक्षकांच्या शिष्टमंडळासह २० मिनिटे चर्चा केली. अनुदानाच्या मुद्द्यावर वित्त विभागाशी चर्चा सुरू आहे. शाळांना अनुदान देण्याच्या मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयावरही कार्यवाही सुरू आहे.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य
शिक्षक संघटना-शिक्षणमंत्र्यांत अनुदानावरून जुंपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:12 AM