पर्यवेक्षणासाठी शिक्षकांना केवळ २५ रुपये मानधन
By Admin | Published: March 23, 2015 10:56 PM2015-03-23T22:56:16+5:302015-03-23T22:56:16+5:30
दहावी आणि बारावीच्या परिक्षेसाठी पर्यवेक्षकांचे काम करणाऱ्या शिक्षकांना गेल्या कित्येक वर्षापासून अवघे २५ रू. मानधन मिळते.
कासा : दहावी आणि बारावीच्या परिक्षेसाठी पर्यवेक्षकांचे काम करणाऱ्या शिक्षकांना गेल्या कित्येक वर्षापासून अवघे २५ रू. मानधन मिळते. महागाईच्या काळात मानधन खुपच कमी असून त्यापेक्षा परिक्षा केंद्रावर दूरवरून जाणाऱ्या शिक्षकांना मोजावे लागणारे प्रवास भाडे त्यापेक्षा जास्त असल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी दहावी आणि बारावी बोर्डाची परिक्षा घेतली जाते. या परिक्षेच्या वेळी पर्यवेक्षकाचे काम करणाऱ्या शिक्षकांना बोर्डाकडून प्रत्येक पेपरसाठी मानधन दिले जाते. मात्र मानधनाची ही रक्कम अत्यंत नगण्य आहे. एका दिवशी एका पेपरसाठी फक्त २५ रू. दिले जातात. तर सांखिक माहिती तयार करण्यासाठी लिपिकांना अवघे ५ रू. मानधन मिळते. तर स्टेशनरी साठीचे मानधन मुख्य केंद्रासाठी १०० विद्यार्थ्यांमागे १० रू आणि उपकेंद्रासाठी ३० रू. दिले जातात. अन्य बाबींसाठी दिला जाणारा केंद्रांचा निधी अत्यल्प आहे. तसेच दहावी बारावीचे पेपर तपासणीसाठी ३ तासाच्या पेपरसाठी ५ रू. मानधन दिले जाते. दोन तासाच्या पेपरसाठी २.५० रू. दरम्यान आदिवासी भागात परिक्षा केंद्र दूरवर आहेत. डहाणू तालुक्यात डहाणू, कासा, वाणगांव, चिंचणी, बोर्डी, येथे दहावीचे परिक्षा केंद्र आहे तर बारावीसाठी चिंचणी, डहाणू, बोर्डी येथे परिक्षा केंद्र आहेत. त्यामुळे पर्यवेक्षणासाठी सायवन, धुंदलवाडी, कासा परिसरातील शिक्षकांना डहाणू, बोर्डीकडील बारावी परिक्षा केंद्रावर पर्यवेक्षणासाठी जाण्यास बसने किंवा रिक्षाने ५० ते ६० रू. खर्च येतो. आणि मानधन केवळ २५ रू. मिळते. त्यामुळे शिक्षकांना वैयक्तीक खर्च करून काम करावे लागते. परिक्षा मंडळाने पाच वर्षापासून परिक्षा फी मध्ये वाढ केली मात्र पर्यवेक्षणाचे मानधन वाढले नाही. (वार्ताहर)
शिक्षकांना पर्यवेक्षणासाठी व पेपर तपासणीसाठी खूप कमी मानधन दिले जाते. आम्ही संघटनेमार्फत परिक्षा मंडळाकडे पर्यवेक्षण व पेपर तपासणीच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली आहे.
- संतोष पावडे, कार्याध्यक्ष, ठाणे पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना