Join us

CoronaVirus : शाळाबाह्य मुलांच्या कुटुंबांना शिक्षकांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:09 AM

सध्याची परिस्थिती पाहता कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या मुलांना पुन्हा शाळाबाह्य व्हावे लागणार की काय?

मुंबई : त्या मुलांच्या घरची कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यातील अनेक मुले ही आतापर्यंत शाळाबाह्य होती. बालरक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना शाळेत दाखल करण्यात आले. मात्र सध्याची परिस्थिती पाहता कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या मुलांना पुन्हा शाळाबाह्य व्हावे लागणार की काय? अशी शंका उपस्थित होत असतानाच पुन्हा बालरक्षक म्हणून काम करणारे आणि इतर शिक्षक या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेले आहेत. हातावर पोट असणाºया या विद्यार्थ्यांच्या ५४० कुटुंबीयांना अन्नधान्याची मदत या शिक्षकांनी करून त्यांची शाळेत येण्याची वाट यानिमित्ताने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.सिग्नल, रस्त्यावर फिरणारी, चहाच्या टपरीवर काम करणारी, लोकलमध्ये साहित्य विकणारी मुले शाळेत जात असतील का, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांनी शिकावे असेही आपल्याला वाटते. परंतु, धावपळीच्या जगात या मुलांच्या शिक्षणासाठी आपण पुढाकार घेण्यास धजावत नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वेठबिगार कामे करणारी मुले, भीक मागणारी मुले यांनाही शिक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी त्यांनी ‘बालरक्षक’ नेमण्याचा निर्णय घेतला. बालरक्षक विविध भागांत उत्तम कामगिरी करत असून अनेक शाळाबाह्य मुलांना त्यांनी शाळेत दाखल केले आहे. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळलेली असताना किती मुले पुन्हा शाळेत येतील, हा यक्षप्रश्न यानिमित्ताने उभा राहत आहे. याची दाहकता कमी करण्यासाठी या मुलांच्या कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी बालरक्षक रामराव पवार आणि त्यांचे सहकारी पुढे आले आहेत. त्यांनी सांताक्रुझ पूर्व आणि पश्चिम आधी शाळाबाह्य असलेल्या आणि शाळेत दाखल केलेल्या मुलांच्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला आहे.प्रत्येक मुलाच्या घरी पालकांच्या साहाय्याने आवश्यक वस्तूंचा पुरवठा रामराव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे यामध्ये ही सोशल डिस्टन्सिगच्या नियमांचे पालन केले जात असल्याची माहिती रामराव पवार यांनी दिली. आतापर्यंत सांताक्रुझ येथील चिरेखानगर, दत्त मंदिर, वाघरी वाडा, मिलन सबवे, लोहिया नगर या वसाहतींमध्ये अत्यावश्यक वस्तूंचे वाटप पालक आणि मुलांना करण्यात आले असल्याची माहिती पवार यांनी दिली. आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा एकदा ही मुले शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकली जाऊ नयेत हा या मदतीच्या मागचा मूळ उद्देश असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.>मुंबईतील बालरक्षक विविध भागांत उत्तम कामगिरी करत असून अनेक शाळाबाह्य मुलांना त्यांनी शाळेत दाखल केले आहे. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळली आहे़