लोन ॲपवरून शिक्षकाच्या धमक्या; कर्जदारांना धमकावण्याचाही घेत होता पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 06:29 AM2022-06-02T06:29:14+5:302022-06-02T06:29:21+5:30
बॉसचा शोध सुरू
मुंबई : शिक्षकाला गुरू, आदर्श मानतात; परंतु हाच गुरू आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. कारण, इन्स्टंट लोन ॲप बदनामी प्रकरणात कर्जदारांना धमकावणारा आरोपी राजू खडाव (३२) हा राजस्थानातील एका खासगी शाळेत शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. मालाडमध्ये इन्स्टंट लोन ॲपने केलेल्या बदनामीला कंटाळून संदीप कोरगावकर यांनी आत्महत्या केल्यानंतर याला कुरार पोलिसांनी अटक केली. खडाव हा कर्जदारांना धमक्या देण्यासाठी त्याच्या ‘बॉस’कडून पगारही घेत असल्याचे उघड झाले आहे. आता या बॉसच्या मागावर पोलीस आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खडाव याने कला शाखेत पदवी (बीए) पूर्ण केली आहे आणि तो देशभरातील कर्जदारांना धमकीचे कॉल करण्याचे काम करत होता. अटक टाळण्यासाठी खडाव हा त्याच्या मोबाइलमध्ये नातेवाइकाचे व्हॉट्सॲप वापरत होता. राजस्थान येथील जोधपूरचा रहिवासी असलेला खडाव पत्नी व आई-वडिलांसोबत राहतो. तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि ज्या शाळेत तो शिक्षक आहे त्यांना त्याच्या गुन्ह्याची माहिती नाही. खडाव धमकाविणे आणि लोकांना त्रास देण्यासाठी त्याच्या बॉसकडून पगार घेत होता.
...म्हणे फोन हॅक झाला
खडावला त्याच्या राहत्या घरातून अटक केली, तेव्हा त्याने पोलिसांना सांगितले की त्याला कर्ज ॲप आणि धमकीचे संदेश तसेच कॉल याबद्दल काहीही माहिती नाही. त्याचा मोबाइल फोन कोणीतरी हॅक केला असावा, जो त्याचा गैरवापर करत असावा, अशीही दिशाभूल केली. मात्र, त्याच्याकडून हस्तगत केलेल्या ४ वेगवेगळ्या मोबाइलमध्ये सापडलेले तांत्रिक पुरावे पोलिसांकडे आहेत.
‘ड्रीम इलेव्हन’ खेळून १५ लाख मिळाले !
- खडाव याच खाते राजस्थानमधील इको बँकेत असून, त्यात १५ लाख रुपये जमा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
- ते पैसे मोबाइलवर ‘ड्रीम इलेव्हन’ हा गेम खेळून जमा केले, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
- तो तंत्रज्ञानात खूप हुशार असून, त्याचा बॉस कोण, त्याला किती पगार आहे, याची माहिती त्याने अद्याप उघड केलेली नाही.