मुंबई : शैक्षणिक वर्ष २०१८-१९पासून दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण कमी आणि येऊ घातलेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे प्रचाराची भाषणेच जास्त ऐकावी लागत असल्याचा सूर प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांमध्ये आहे.शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जून २०१८ मध्ये होणार असून यासाठीची मोर्चेबांधणी शिक्षक आमदार आणि शिक्षक संघटनांनी सुरू केली आहे. त्यामुळेच कोणाचीही परवानगी न घेता शासनातर्फे आयोजित शिक्षकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमातच आपला प्रचार करण्याची संधी हे उमेदवार सोडत नसल्याचे दिसून येत आहे.नवीन अभ्यासक्रम आल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. अनेकदा प्रशिक्षण जुलै-आॅगस्टमध्ये देण्यात येत होते. तसेच माध्यमनिहाय प्रशिक्षण वेगवेगळे दिले जाते. यंदा मात्र शिक्षकांच्या प्रशिक्षणाचेही एप्रिलमध्येच नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विषयाच्या एका दिवसाच्या प्रशिक्षणात ८ तासांच्या प्रशिक्षण काळात १ तासाचे मध्यंतर असते.सोमवार ९ एप्रिल या पहिल्याच दिवशीच्या प्रशिक्षण काळात शिक्षक भारतीचे कपिल पाटील आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांच्या उमेदवारांनी आपला प्रचार केला. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नाराजी दर्शवली आहे. जूनमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिक्षक प्रशिक्षणाचा वेळ का वाया घालवला जात आहे, असा सवाल उपस्थित शिक्षकांकडून करण्यात येत आहे.मुंबई पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका शाळा सुरू झाल्यानंतर होणार असून दरम्यानच्या काळात शाळा बंद असल्याने या निवडणुकांच्या उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. प्रशिक्षणादरम्यान मुंबईतील १४०० ते १५०० शिक्षक एकाच वेळी उपस्थित असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे असल्याने शिक्षक आमदार याचदरम्यान प्रचाराचा मार्ग अवलंबत असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा मार्ग चुकीचा असून यामुळे शिक्षकांना आवश्यक, पुरेसे आणि दर्जात्मक प्रशिक्षण मिळणार नसल्याचा सूर शिक्षकांमधून येत आहे.>निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारमुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेने विद्यमान आमदार दीपक सावंत यांनाच उमेदवारी दिली आहे. शिक्षक मतदारसंघाच्या मुंबईच्या जागेसाठी शिक्षक भारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील हेच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्याच संघटनेचे जालिंदर सरोदे पदवीधर मतदारसंघासाठी सज्ज आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उभे असून त्यांनीही प्रशिक्षणादरम्यान प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.काहीच गैर नाहीमी शिक्षक आमदार असून शिक्षकांचे प्रश्न सोडवणे माझे काम आहे. मी दरवेळी शिक्षक प्रशिक्षणादरम्यान उपस्थित असतो. त्यामुळे मी तेथे जाणे यात काही गैर नाही.- कपिल पाटील, आमदार,शिक्षक भारतीसमस्या जाणून घेणे हाच उद्देशशिक्षकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी,त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणादरम्यान त्यांचा काही मिनिटांचावेळ आम्ही घेतला. शिक्षकांच्या समस्या जाणून घेणे हाच उद्देश त्यामागे होता.- अनिल बोरनारे, उमेदवार,शिक्षक मतदारसंघ
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम ठरला निवडणुकीच्या प्रचाराचे मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 6:13 AM