शिक्षकांच्या लसीकरणाचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 07:32 AM2021-03-26T07:32:21+5:302021-03-26T07:32:37+5:30
परीक्षांच्या पार्श्वभूमीवर फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून लसीकरण होणार सुरू
मुंबई : दहावी, बारावीच्या आगामी बोर्डाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून कोरोनाची प्रतिबंधात्मक लस टोचण्यात येणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. केंद्राच्या सूचनांचे पालन करून लसीच्या दोन डोसमध्ये ४ ते ५ आठवड्यांचे अंतर राखून लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील खासगी रुग्णालये, महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांसह रेल्वे, सर्वोपचार रुग्णालयात शिक्षकांसाठी लसीकरणाची सोय करण्यात येईल. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी संपूर्ण राज्यातून परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची ही मोठी संख्या या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावी लागणार आहे. दरम्यान प्रश्नपत्रिका वाटप, त्या गोळा करणे, त्यांची ने-आण करणे तसेच तपासणीसाठी मोठे संख्याबळ लागणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी ही महत्त्वाची असणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संसर्गाची भीती राहू नये, त्यांची सुरक्षितता यादृष्टीने त्यांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून लस देण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच पत्रकार परिषदेत दिली होती. त्याच अनुषंगाने लवकरच या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.
वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन झाल्यास विद्यार्थ्यांना लस दिली जाणार नसली तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या उपाययोजना परीक्षा केंद्रावर करण्यात येणार आहेत. शिवाय काही जिल्ह्यांतील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. मात्र परीक्षा काळात अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यास कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला नियमित विद्यार्थ्याप्रमाणेच परीक्षा देता येणार असल्याने विद्यार्थी, पालकांनी घाबरू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
राज्यात काही ठिकाणी लस देण्यास सुरुवात
राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनी स्वत:हून कोरोनाची टेस्ट करून घ्यावी, यासाठी जनजागृती करण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. तसे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीला अनेक शिक्षक कोरोनाबाधित झाले तर काहींचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिक्षकांना लस टोचण्यास परवानगी देण्यात आली आहे.