कोविड सेंटरवर वर्षभरापासून रुग्ण, डॉक्टर, नर्सेसच्या गरजांचे व्यवस्थापन करणारा शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:06 AM2021-05-07T04:06:55+5:302021-05-07T04:06:55+5:30

महापालिका शिक्षक करतात कोविड काळात कोरोनायोद्ध्यांचे काम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालिकेतील अंधेरी मनपा हिंदी शाळेत सहावी ते ...

A teacher who manages the needs of patients, doctors, nurses throughout the year at the Covid Center | कोविड सेंटरवर वर्षभरापासून रुग्ण, डॉक्टर, नर्सेसच्या गरजांचे व्यवस्थापन करणारा शिक्षक

कोविड सेंटरवर वर्षभरापासून रुग्ण, डॉक्टर, नर्सेसच्या गरजांचे व्यवस्थापन करणारा शिक्षक

Next

महापालिका शिक्षक करतात कोविड काळात कोरोनायोद्ध्यांचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पालिकेतील अंधेरी मनपा हिंदी शाळेत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे (लाकूडकाम विषयक शिक्षण) धडे देणारे शिक्षक इस्माईल शेख हे मागील वर्षभरापासून पीडब्यूडी आयसोलेशन सेंटरवर कोरोना रुग्ण, तेथील डॉक्टर, नर्सेस आणि तेथील सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. ५ मे २०२१ रोजी त्यांना आपल्या कोविड ड्युटीवर रुजू होऊन वर्ष झाले तरी कोरोनायोद्धा म्हणून काम करण्यास आणि यानिमित्ताने समाजाशी असलेली बांधिलकी, देशसेवा करण्याची संधी मिळाल्याने समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोविड सेंटरवरील व्यवस्थापनाची जबाबदारी संभाळत असताना त्यांनी शाळेचे ऑनलाइन वर्ग आणि इतर कामेही तितक्याच जबाबदारीने सांभाळली असल्याची माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेक महानगरपालिका शिक्षकांच्या सेवा कोरोना काळातील कामासाठी अधिग्रहित करण्यात आल्या. यामध्ये अनेक शिक्षक, वॉर रूममध्ये, कोविड सेंटरमध्ये, लसीकरण केंद्रावर कार्यरत आहेत. इस्माईल शेख यांनाही ५ मे २०२० रोजी कोविड ड्युटीची ऑर्डर मिळाली. सुरुवातीला कुटुंबाच्या काळजीस्तव घाबरलेल्या इस्माईल यांनी मग धीराने आणि कोविड मार्गदर्शन सूचनांप्रमाणे ६० रुग्णांची क्षमता असलेल्या सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि आजही ते तिथेच कार्यरत आहेत.

१५ दिवसांनी ऑर्डर बदलण्याची प्रक्रिया असली तरी त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या स्व इच्छेमुळे ते तिथेच कार्यरत आहेत. रुग्णांच्या जेवणापासून ते डॉक्टर्स, नर्सेस यांना लागणाऱ्या पीपीई किट, हँडग्लोव्हज, मास्क, लाँड्रीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी इस्माईल पाहत आहेत. अगदी पालिकेकडून प्राप्त आणि रुग्णांना आवश्यक स्वच्छतेच्या वस्तूंचा पुरवठाही ते पाहतात. विद्यार्थ्यांना घडविणे हे तर शिक्षकाचे काम आहेच; मात्र याशिवाय या संकटकाळात समाजोपयोगी येणे हीसुद्धा मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. घरी गेल्यानंतर ते स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवश्यक सर्व गोष्टी करतात आणि त्यानंतरच कुटुंबीयांसोबत बसतात, अशी माहिती त्यांनी दिली. शिवाय, आपण प्रत्येकाने कोविड संबंधित मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कोरोना नियंत्रणास हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

* ५४७ शिक्षक कोविड ड्युटीवर

पहिल्या लाटेमध्ये महापालिका शिक्षकांची मदत घेतल्यानंतर पालिका प्रशासनाला या वेळीही गरज असल्याने विविध कोरोना ड्युटीअंतर्गत मुंबईतील ५४७ शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. दरम्यान, सर्वाधिक शिक्षक हे वॉर रूममध्ये कार्यरत असून रुग्णांना आवश्यक माहिती, लोकांना उपलब्ध बेड्स, सेंटर्स किंवा अन्य सेवांची आवश्यक माहिती पुरविण्याचे काम हे शिक्षक करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

--------------------------

Web Title: A teacher who manages the needs of patients, doctors, nurses throughout the year at the Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.