मुंबई : विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न घेऊन आझाद मैदानात राज्यभरातील शिक्षकांचे उपोषण सुरू आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी शिक्षकांनी मेणबत्ती मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना तत्पूर्वीच ताब्यात घेतल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. परिणामी, आता शिक्षक आपल्या मागण्यांसाठी अधिकच आक्रमक झाले असून, मेणबत्ती मोर्चानंतर मंगळवारी ‘झोपू’ आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलक शिक्षकांनी दिला आहे.विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा अध्यादेश देणे व अघोषित शाळा घोषित करणे या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांचे आंदोलन १ जूनपासून आझाद मैदानात सुरू आहे. सोमवारी न्याय हक्कासाठी आझाद मैदान ते मंत्रालय असा मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार होता, पण मोर्चा निघण्याआधीच आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेले शिक्षक अधिकच आक्रमक झाले आहेत. मंगळवारी शिक्षकांच्या मागणीचा विचार केला नाही तर ‘झोपू’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कृती समितीने दिला आहे. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेणे म्हणजे हे एक प्रकारे त्यांची मुस्कटदाबी करण्यासारखेच आहे. न्याय हक्कासाठी शांतपणे मोर्चा काढणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेणे चुकीचे आहे, असे महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिक्षक आता करणार ‘झोपू’ आंदोलन
By admin | Published: June 14, 2016 3:30 AM