शिक्षक आणि बार्टी उपोषणकर्ते निघाले वर्षा बंगल्यावर! पोलिसांकडून आझाद मैदानाचे सर्व दरवाजे बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 05:09 PM2024-02-06T17:09:20+5:302024-02-06T17:11:32+5:30
संतापलेल्या उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आझाद मैदान दणाणून सोडले.
श्रीकांत जाधव, मुंबई : शिक्षकांच्या मागण्यांसाठी तसेच संशोधन फेलोशिपसाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेल्या शिक्षक, बार्टी विद्यार्थ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर धाव घेतली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी मैदानाचे सर्व दरवाजे बंद केले. त्यावर संतापलेल्या उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आझाद मैदान दणाणून सोडले.
अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्यव संघाच्या नेतृत्वाखाली गेल्या ३६ दिवसांपासून खाजगी शिक्षक बेमुदत उपोषणास बसले आहेत. तसेच बाटीच्या संशोधन फेलोशिपसाठी गेल्या दोन महिन्यापासून संशोधन विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलने, उपोषणे करीत आहेत.
मंगळवारी मोठ्या संख्येने दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते आझाद मैदानात आले होते. त्यावेळी सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
जोरदार घोषणाबाजी करत उपोषणकर्त्यांनी मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढला. अचानक काढलेल्या मोर्चामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. त्यांनी मैदानाची सर्व प्रवेशद्वारे बंद करून उपोषणकर्त्याना रोखून धरले. त्यामुळे उपोषणकर्ते अधिकच संतापले. बार्टीच्या विद्यार्थ्यांनी मैदानाच्या दरवाजावर चढून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि उपोषणकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी अटकाव केल्यामुळे दरवाजावरच ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी देत उपोषणकर्त्याना आझाद मैदान दणाणून सोडले. यावेळी काही काळासाठी आझाद मैदानात तणाव निर्माण झाला होता.