शिक्षिका, मदतनीसांचे मानधन वाढणार
By admin | Published: July 9, 2017 02:29 AM2017-07-09T02:29:45+5:302017-07-09T02:29:45+5:30
पालिकेच्या शाळांमध्ये चालविण्यात येणाऱ्या बालवाडीच्या शिक्षिकांचे व मदतनीसांचे मानधन अत्यल्प आहे. यामध्ये वाढ करण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत होती.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेच्या शाळांमध्ये चालविण्यात येणाऱ्या बालवाडीच्या शिक्षिकांचे व मदतनीसांचे मानधन अत्यल्प आहे. यामध्ये वाढ करण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत होती. अखेर या मागणीला स्थायी समितीने हिरवा कंदील दिला आहे. पालिका महासभेच्या अंतिम मंजुरीनंतर बालवाडी शिक्षिका व मदतनीसांना दिलासा मिळणार आहे.
सन २००७-०८पासून खासगी संस्थांच्या मदतीने मुंबई महापालिकेच्या ५०४ बालवाड्या सुरू आहेत. या बालवाडीत शिकवणाऱ्या शिक्षकांना सुरुवातीला प्रति महिना १५०० रुपये, तर मदतनीसांना ७५० रुपये मानधन दिले जात होते. सन २००९-१०मध्ये या मानधनात वाढ करून शिक्षिकांचे मानधन २ हजार रुपये तर मदतनीसांचे मानधन १ हजार रुपये करण्यात आले.
त्यानंतर सन २०१४-१५मध्ये या शिक्षक व मदतनीसांचे मानधन अनुक्रमे ३ हजार व १५०० रुपये एवढे करण्यात आले होते. महागाईच्या तुलनेत हे मानधन अल्प असल्यामुळे सन २०१७-१८मध्ये बालवाडीच्या शिक्षकांना ५ हजार रुपये तर मदतनीसांना ३ हजार एवढे मानधन प्रति महिना देण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीनुसार पालिका प्रशासनाने मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.