दहा दिवसांत १० स्पर्धांचे आयोजन करण्याची शिक्षकांना सक्ती

By रेश्मा शिवडेकर | Published: January 15, 2024 09:11 AM2024-01-15T09:11:27+5:302024-01-15T09:11:36+5:30

शिक्षकांनी या कामात हयगय करू नये म्हणून कार्यक्रमाच्या सेल्फी काढून त्या त्या स्पर्धेच्या हॅशटॅगने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

Teachers are forced to organize 10 competitions in 10 days | दहा दिवसांत १० स्पर्धांचे आयोजन करण्याची शिक्षकांना सक्ती

दहा दिवसांत १० स्पर्धांचे आयोजन करण्याची शिक्षकांना सक्ती

मुंबई : ‘परीक्षा पे चर्चा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फेब्रुवारीत होऊ घातलेल्या विद्यार्थी-शिक्षक-पालक संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने परीक्षांच्या तोंडावरच दहा दिवसांत दहा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून त्याच्या सेल्फी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी शिक्षकवर्गावर टाकण्यात आली आहे; परंतु दहावीच्या सराव आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा तोंडावर असताना या स्पर्धांमध्ये दररोज तीन-चार तास मोडणार असल्याने शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. 

मॅरेथॉन रन, संगीत, पथनाट्य, नक्कल, छोट्या व्हिडीओंवर चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांच्या मुलाखती, पोस्टर मेकिंग, योग-ध्यानधारणा, सुविचार, बोधप्रद गोष्टी, बातम्यांचे वाचन, स्फूर्तिदायक गीतगायन अशा दहा स्पर्धा शाळांना १२ ते २३ जानेवारीदरम्यान घ्यायच्या आहेत. या प्रत्येक स्पर्धेसाठी हॅशटॅग ठरवून देण्यात आला आहे. 
शिक्षकांनी या कामात हयगय करू नये म्हणून कार्यक्रमाच्या सेल्फी काढून त्या त्या स्पर्धेच्या हॅशटॅगने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

नियोजनात बसविणे कठीण
आमच्या शाळेला शनिवारी हे स्पर्धा कार्यक्रमांचे पत्र मिळाले. एक तर १२ दिवसांतील चार दिवस सुटीत जाणार आहे. त्यात उरलेल्या आठ दिवसांत या स्पर्धांचे आयोजन करायचे आहे. एक स्पर्धा घ्यायची म्हटली तर शाळेचे तीन तास सहज जातात. त्यात परीक्षांची कामे तोंडावर आहेत. शाळेच्या नियोजनात हे बसविणे फारच कठीण आहे.
- एक शिक्षक 

 विषय काय? परीक्षेचा ताण कमी करणे...  
 शाळांना २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करायचे आहे. 
 या स्पर्धेचा विषय ‘पंतप्रधानांनी परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी दिलेला कानमंत्र’ असा आहे; परंतु परीक्षांच्या तोंडावर करण्यात येणाऱ्या या सक्तीच्या उपक्रमांमुळे आमच्याच काय तर विद्यार्थ्यांच्याही ताणात भर पडते, अशी बोलकी प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली. 

शाळांनी नियोजनानुसार सहभाग नोंदवावा
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी वातावरण निर्मित केली जात आहे. शाळांनी आपापल्या नियोजनानुसार या उपक्रमांचे आयोजन करून सहभाग नोंदवावा, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी दिली.

गेल्या १५ दिवसांत शिक्षकांना लागलेली कामे
     निपुण भारतचे प्रशिक्षण
     ‘परीक्षा पे चर्चा’साठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी
     साक्षरता अभियान
     मराठा समाजातील कुटुंबांचे सर्वेक्षण
     मतदार जागृतीनिमित्त उपक्रम
     मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळे’साठी ऑनलाइन माहिती नोंदवणे

Web Title: Teachers are forced to organize 10 competitions in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक