लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी ही शिक्षकांची असते. मात्र, मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. जिल्हा परिषद शिक्षकांना मतदारयाद्या तयार करणे, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, यू डायसवर माहिती भरण्यासह अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात. शिक्षकांना या कामातून मुक्त करून केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्यावर देणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण विभागाने दीड महिन्यांत चार चाचण्या घेण्याची अट शिक्षण विभागाने घातली आहे. या चाचण्यांची संख्या कमी करावी, अशी मागणी शिक्षकांमधून केली जात आहे. सध्या शिक्षकांना साक्षर निरक्षर व्यक्तींच्या सर्वेक्षणाचे नवे काम आले आहे. साक्षरता सर्वेक्षणाच्या कामातही शिक्षकांचा महिनाभराचा कालावधी जातो. या कामात अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा हा प्रश्न सतावत आहे.
शिकवायचे कधी?
शिकविण्यापेक्षा शाळाबाह्य कामे अधिक आहे. त्यामुळे शिकविण्यासाठी वेळ अपुरा मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.- सुरेंद्र खडपे, शिक्षक
मतदारयादी
मतदारयाद्या तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शिक्षकांची नियुक्ती केली जात असल्याने अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे.
आधार कार्ड काढणे
शाळाबाह्य कामांची पूर्वीची संख्या कमी होती म्हणून आता नव्याने विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी टाकली आहे.
शाळेची माहिती भरणे
- प्राथमिक शाळांना लिपिक नसल्यामुळे शाळेची सर्व माहिती ऑनलाइन भरण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे.
- साइट कधी स्लो तर कधी बंद असते यात विनाकारण वेळ वाया जातो.
- प्राथमिक शाळेमध्ये लिपिक सुविधा नाही, त्यामुळे शाळेची सर्व माहिती ऑनलाइन भरण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
शैक्षणिक सोडून शाळाबाह्य कामे कमी करण्याची गरज आहे. शिक्षकांचा फार वेळ शाळाबाह्य कामातच जातो. हजारावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने पाहावे.- राजश्री कवटकर, शिक्षिका