मुंबई : शाळेसह गेल्या काही वर्षांत खासगी शिकवण्यांचे महत्त्व वाढले आहे. खासगी शिकवण्यांसाठी अवास्तव शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे मुंबईसह राज्यातील शालेय शिक्षकांच्या खासगी शिकवण्यांना चाप लावण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले आहे, पण या परिपत्रकातील नियमावलीमुळे शिक्षक संभ्रमावस्थेत असून, नाराजी व्यक्त केली आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार परवानगी नसली, तरी महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९८१ नुसार शिक्षकाला पाच विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्याची मुभा असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षण हक्क कायद्याचे शिक्षक उल्लंघन करीत आहेत. या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले. खासगी शिकवणी घेणार नाही, असे हमीपत्र शिक्षकांकडून घेण्यात येणार आहे.मात्र, खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली कलम २३ (ब) नुसार, शिक्षक दिवसाला दोन तासांपेक्षा अधिक वेळ खासगी शिकवणी घेऊ शकत नाहीत किंवा दिवसातील शिकवणीच्या संपूर्ण कालावधीत पाचपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाहीत, असा उल्लेख असल्याने, शिक्षक पाच विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊ शकतात, परंतु शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आदेशात या नियमाचा उल्लेख केला नसून, त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याची माहिती शिक्षक भारतीचे उदय नरे यांनी दिली.विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, तसेच सेल्फ फायनान्स शाळांमधील शिक्षकांना नियमानुसार पूर्ण वेतन देणे बंधनकारक आहे, पण या नियमाचे पालन शाळा करत नाहीत. अशा अनेक शाळांमध्ये अत्यल्प पगारावर शिक्षकांना राबवून घेतले जाते. याबाबत मुंबईतील शिक्षण निरीक्षकांकडे लेखी तक्रार केल्यावरही कारवाईसाठी टाळाटाळ केली जाते, असे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी स्पष्ट केले.
खासगी शिकवणीच्या परिपत्रकातील नियमावलीमुळे शिक्षक संभ्रमावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 6:12 AM