शिक्षकांचा अभ्यासक्रमही बदलणार, बीएडच्या अभ्यासक्रमासाठी सामाईक परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:44 AM2018-05-17T06:44:23+5:302018-05-17T06:44:23+5:30
दहावीतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता बीएडच्या अभ्यासक्रमातही २०१८-१९च्या शैक्षणिक वर्षापासून बदल होत आहे.
मुंबई : दहावीतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता बीएडच्या अभ्यासक्रमातही २०१८-१९च्या शैक्षणिक वर्षापासून बदल होत आहे. चार आणि तीन वर्षांच्या एकात्मिक अभ्यासाक्रमांसाठी यंदाच्या जून महिन्यात प्रवेश परीक्षा होणार आहे. याशिवाय, यासाठी वेगळी सामाईक प्रवेश परीक्षा राज्याच्या सीईटी सेलमार्फत घेतली जाईल. या संदर्भातील शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकताच जारी केला. आतापर्यंत बारावीनंतर प्लेन डिग्री व दोन वर्षांचा अभ्यासक्रम होता. आता या प्रवेशाचा स्तर बदलल्यामुळे एक वर्ष वाचणार आहे.
महाराष्ट्रात निवडक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये चार व तीन वर्षांचे बीएडचे अभ्यासक्रम राबविले जातात. कोणते अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करायचे हा निर्णय शासन घेते. केंद्र व राज्य सरकारने बीएड अभ्यासक्रमाला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्याने, बीएड महाविद्यालयांतील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा सीईटी घेण्यात येणार असल्याची माहिती आयटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. याची सर्व तयारी सीईटी सेलकडून झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी जूनमध्ये होणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता येतील. या संदर्भातील सामाईक प्रवेश परीक्षा ७ जुलै रोजी आॅनलाइन घेण्यात येईल.
या अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश हे केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे एक खिडकी पद्धतीने शासन निर्णयात नमूद आहे. विद्यार्थ्यांचे बारावीचे गुण आणि सामाईक प्रवेश प्रक्रियेत मिळालेले गुण यांच्या आधारावर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल.