अलिबाग : आपल्या विविध मागण्यांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा, यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक संघटनेने आज पुकारलेल्या एकदिवसीय संपाला जिल्ह्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या पाच दिवसात विविध संघटनेच्या समन्वय समितीची बैठक घेण्यात येणार आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास २ फेब्रुवारीला आंदोलन करणारच असा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील हिराकोट तलाव परिसरात आंदोलकांना अडविण्यात आले. याप्रसंगी अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त मंडळ, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यासह अन्य संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.रायगड जिल्ह्यातील कोकण एज्युकेशन सोसायटी आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी शाळा बंद आंदोलनात उस्फूर्त सहभाग घेतला तर अन्य शाळांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.राज्यात विनाअनुदान धोरण तातडीने रद्द करावे, चिपळूणकर समितीच्या शिफारशीप्रमाणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे तातडीने मंजूर करावीत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे बंद करण्यात आलेले अनुदान सहाव्या वेतन आयोगा नुसार सुरु करावे आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. याशिवाय शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याची प्रक्रिया कायमस्वरुपी बंद करुन शिक्षकांची पदे भरावीत, अनुदानास पात्र असणाऱ्या सर्व तुकड्यांना तातडीने अनुदान द्यावे, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी यासह अन्य मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शिक्षक, कर्मचा-यांचे शाळा बंद आंदोलन
By admin | Published: January 13, 2015 10:20 PM