मुंबई विद्यापीठ गोंधळ प्रकरण : शिक्षकांचे पेपर तपासणीचे रखडले मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 02:30 PM2017-11-16T14:30:24+5:302017-11-16T14:32:17+5:30
मुंबई विद्यापीठात गेल्या सत्रामध्ये पेपर तपासणी कमालीची उशिराने सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.
मुंबई : मुंबई विद्यापीठात गेल्या सत्रामध्ये पेपर तपासणी कमालीची उशिराने सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. शिक्षक पेपर तपासणीसाठी येत होते परंतु पेपरचे स्कॅन करून न झाल्याने, ऑनलाईनमध्ये दुसऱ्याच विषयाचे पेपर समोर आले. यामुळे काही शिक्षकांना नियुक्ती पत्र मिळाले नाही इत्यादी अनेक कारणे काहीही असोत परंतु यात शिक्षकांनादेखील नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. चूक विद्यापीठाची असतानादेखील विद्यापीठाने शिक्षकांनाच धमकावणीची-कारवाई करण्याची पत्रे पाठविली.
अशी अभूतपूर्व परिस्थिती असतानादेखील शिक्षकांनी आपले काम सोडले नाही. विद्यार्थ्यांचे पेपर तपासून झाले पाहिजेत, त्यांचे नुकसान होऊ नये हा उद्देश मनात ठेवून रात्री उशिरापर्यंत शिक्षकांनी पेपर तपासले. काहींनी शनिवार, रविवार अगदी सुट्टीच्या आणि सणासुदीच्या काळात देखील पेपर तपासणीचे काम पार पाडले हे विद्यापीठानेदेखील आमच्यासोबत झालेल्या जाहीर बैठकांमध्ये मान्य केलेले आहे.
असे असताना अजूनही पेपर तपासणीचे मानधन मात्र शिक्षकांना मिळालेले नाही. बऱ्याच शिक्षकांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत. मानधनासाठी संबंधित अधिकारी त्यांची अवहेलना करीत आहेत. मानधनासाठीचा फॉर्म आणि सर्व सोपस्कार पूर्ण होऊनही आज 2 महिने होत आले परंतु हजारो शिक्षकांना अद्याप मानधन मिळालेले नाही हे आम्ही कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा संचालकांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे.
येणाऱ्या नवीन सत्राची परीक्षा सुरू झालेली आहे. त्यांचे पेपर तपासणीचे कामदेखील पुढे येणार आहे. परंतु मागच्याच परीक्षेचे मानधन न मिळाल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काम करूनही त्याचा मोबदला मिळणार नसेल तर विद्यापीठाने उगाच शिक्षकांकडून कामाची अपेक्षा करू नये याकारणे मुक्ता शिक्षक संघटनेने निवेदन विद्यापीठाला दिलेले असून सर्व शिक्षकांचे मानधन लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करण्याची लेखी विनंती केली आहे.
विद्यार्थी आणि पालकांचा रोष ओढवून घेणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी किमान आता शिक्षकांच्या रोषाला सामोरे जाऊ नये, असे मुक्ता शिक्षक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वैभव नरवडे यांनी सांगितले आहे. तसेच ज्या-ज्या शिक्षकांना मानधन अद्याप मिळालेले नाही त्यांनी मुक्ता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील संघटनेने केले आहे.