Join us

"शिक्षकांची शाळाबाह्य कामे हळूहळू कमी करणार, पण..."; मुख्यमंत्र्यांना शिक्षकांकडूनही एक अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 9:17 AM

सरकारी शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासह इतही शाळाबाह्य कामेच अधिक असतात, अशी नेहमीच ओरड असते.

मुंबई - शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात सहभागी होऊन विजयी ठरलेल्या शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शाळांचा परिसराचा आणि त्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीबद्दल खंत व्यक्त केली. तर, शिक्षकांची शाळाबाह्य कामे हळू हळू कमी करण्यात येतील, असे आश्वासनही शिक्षकांना दिले. 

सरकारी शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासह इतही शाळाबाह्य कामेच अधिक असतात, अशी नेहमीच ओरड असते. त्यामध्ये, निवडणूक ड्युटी असेल, रेकॉर्ड तयार करणं असले, स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित इतरही काही कामे असतील. त्यामुळे, शासनाने शिक्षकांचा हा ताण कमी करावा, अशी मागणी नेहमीच होत असते. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षकांची ही कामे करण्याचे आश्वासन दिलं आहे. 

आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षक हेच मुलांच्या सगळ्यात जवळ असतात. आयुष्याला नवीन आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळेच तुम्हाला न्याय देताना हातचे काहीं राखून ठेवले जाणार नाहीत. तसेच शाळाबाह्य कामे हळूहळू कमी करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तर, ग्रामीण भागात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची गळती कमी व्हायला हवी, अशी अपेक्षाही शिक्षकांकडून व्यक्त केली. कारण, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या नसल्याची ओरड सातत्याने पाहायला मिळते. 

आपल्या देशाचा जीडीपी उत्तम आहे, एफडीआयमध्ये राज्य आघाडीवर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम असल्याने अनेक उद्योग राज्यात गुंतवणुकीला पसंती देत आहेत त्यामुळे भविष्यात अनेक रोजगार निर्माण होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हेदेखील नव्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी कायम सजग असतात. त्यासाठीच त्यांनी 'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणत केंद्र सरकारही प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशाळाशिक्षकमुंबई